गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी प्रशासन अलर्ट; मार्गावरील अतिक्रमणे, केबल व बांधकाम साहित्य हटविण्याचे आदेश
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)दि. २३ :- आगामी २५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने विसर्जन मिरवणूक मार्गाची संयुक्त पाहणी केली. मिरवणूक शांततेत, सुरक्षित आणि सुरळीत पार पडावी यासाठी मार्गावरील अडथळे तातडीने दूर करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या.
महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, मनपा आयुक्त अमोल येडगे आणि पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्यासह मनपा, पोलीस प्रशासन आणि महावितरणचे अधिकारी पाहणीमध्ये सहभागी झाले होते.
संस्थान गणपती मंदिर, राजाबाजार येथून सुरू होणाऱ्या मुख्य मिरवणूक मार्गाची शहागंज, सिटी चौक, गुलमंडी मार्गे संभाजीपेठ येथील जिल्हा परिषद मैदानातील विसर्जन विहिरीपर्यंत पायी पाहणी करण्यात आली.
अनधिकृत केबल आणि अतिक्रमणे हटविण्याचे निर्देश
मिरवणूक मार्गावरील अनधिकृत केबल तातडीने हटविण्यात याव्यात, महावितरणच्या वीजवाहिन्यांची आवश्यकतेनुसार उंची वाढवावी, तसेच पाइपलाइनच्या कामासाठी करण्यात आलेल्या खोदकामाच्या ठिकाणी पडून असलेला बांधकाम मलबा, पाइप आणि अन्य साहित्य हटवावे, अशा सूचना देण्यात आल्या.
तसेच मार्गावरील उघड्या पाण्याच्या व्हॉल्व्हना झाकण बसवावे आणि मिरवणुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवावीत, असे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले.
विसर्जन विहिरींची पाहणी
पाहणीदरम्यान संभाजीपेठ येथील जिल्हा परिषद मैदान, क्रीडा संकुल परिसर आणि शिवाजीनगर येथील विसर्जन विहिरींचीही पाहणी करण्यात आली. नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन स्वच्छता, प्रकाश व्यवस्था, वाहतूक नियंत्रण आणि आवश्यक सोयी-सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवण्याच्या सूचना मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
क्रीडा संकुलातील विसर्जन विहिरीचा वापर करण्याचे आवाहन
गारखेडा परिसरातील क्रीडा संकुल येथे यंदा प्रथमच गणेश विसर्जनासाठी स्वतंत्र विसर्जन विहीर सज्ज करण्यात आली आहे. येथे मोठ्या प्रमाणात मोकळी जागा आणि नागरिकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
त्यामुळे गारखेडा आणि परिसरातील नागरिकांनी गणेशमूर्ती विसर्जनासाठी क्रीडा संकुलातील विसर्जन विहिरीचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन महापौर, पदाधिकारी आणि मनपा आयुक्तांनी केले.
गणेश विसर्जनाच्या दिवशी नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि मिरवणूक शांततेत, सुरक्षित व सुरळीतपणे पार पडावी, यासाठी महानगरपालिका, पोलीस प्रशासन, महावितरण आणि संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड | जनतेसाठी समर्पित