गंगापूरमध्ये गावठी कट्ट्याचा धाक दाखवणाऱ्या दोघांना बेड्या; १.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २१ :- गंगापूर तालुक्यातील कायगाव शिवारात गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या दोन तरुणांना छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. या कारवाईत गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे, दोन मोबाईल आणि एक दुचाकी असा एकूण १ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई
दिनांक १९ ऑक्टोबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय सिंह राजपूत यांना गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कायगाव शिवारात दोन व्यक्ती गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे घेऊन दहशत माजवत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यांनी ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यानंतर पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव आणि अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक रवाना करण्यात आले.
झडतीत गावठी कट्टा आणि काडतुसे आढळली
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कायगाव शिवारात शोधमोहीम राबवून संशयित दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे, रेडमी आणि रिअलमी कंपनीचे प्रत्येकी एक मोबाईल तसेच हिरो स्प्लेंडर मोटारसायकल असा एकूण १ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
दोघांविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणांची नावे विनोद विठ्ठल पवार (वय २०, रा. कणकुरी, ता. गंगापूर) आणि स्वप्नील सुभाष पवार (वय २४, रा. दिघी, ता. गंगापूर) अशी आहेत. दोघांना जप्त मुद्देमालासह गंगापूर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गंगापूर पोलीस करीत आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव आणि अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय सिंह राजपूत, पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे तसेच पोलीस हवालदार गोपाल पाटील, बलवीरसिंग बहुरे, योगेश तरमळे, जीवन घोलप आणि शिवाजी मगर यांच्या पथकाने केली.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित