खतांचा साठेबाजार थांबवण्यासाठी मोठा निर्णय! जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश – टास्क फोर्स तयार करा

खतांचा साठेबाजार थांबवण्यासाठी मोठा निर्णय! जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश – टास्क फोर्स तयार करा

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १७ :– जिल्ह्यात युरिया व इतर खतांचा प्रमाणापेक्षा जास्त साठा आणि बेकायदेशीर विक्री रोखण्यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी साठेबाज व गैरव्यवहार करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश देत विशेष टास्क फोर्स स्थापन करण्याच्या सूचना दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय खतसाठा नियंत्रण समितीच्या बैठकीत त्यांनी स्पष्ट सांगितले की, शेतकऱ्यांच्या गरजेपेक्षा जास्त खत खरेदी किंवा विक्री होत असल्यास त्याची तातडीने तपासणी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल.

बैठकीत युरिया, डीएपी, एमओपी, एसएसपी व संयुक्त खतांच्या उपलब्धता, मागणी आणि वितरणाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सध्या जिल्ह्यात युरियाचा सुमारे १०,५५० मेट्रिक टन तर डीएपीचा १,२०० मेट्रिक टन साठा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली.

👉 कडक कारवाईचे इशारे

एकाच नावावर जास्त खत खरेदी करणाऱ्यांची तपासणी

बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई

दोषी आढळल्यास परवाना रद्द व विक्रीवर बंदी

तपासणीसाठी कृषी विभागासोबत पोलीस प्रशासनाची मदत

जिल्हाधिकाऱ्यांनी टास्क फोर्समार्फत शेतकऱ्यांच्या यादीनुसार खत खरेदीची खातरजमा करण्याचे निर्देशही दिले. तसेच तालुकानिहाय खत वितरणाचे नियोजन काटेकोरपणे करण्यावर भर देण्यात आला.

दरम्यान, जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन, ऊस, मोसंबी आदी पिकांच्या उत्पादनासह कृषी विकासाचा आढावाही घेण्यात आला. बियाणे आणि खतांचा योग्य पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी कृषी विभागाच्या कामकाजाची समीक्षा करण्यात आली.

👉 “साठेबाजांवर कारवाई अटळ, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी प्रशासन सज्ज!”