“कर थकवला तर मालमत्ता सील! मनपाची मोठी कारवाई; 8 कोटींच्या थकबाकीवर जप्तीचा बडगा”

“कर थकवला तर मालमत्ता सील! मनपाची मोठी कारवाई; 8 कोटींच्या थकबाकीवर जप्तीचा बडगा”
“कर थकवला तर मालमत्ता सील! मनपाची मोठी कारवाई; 8 कोटींच्या थकबाकीवर जप्तीचा बडगा”

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २३ :- महानगरपालिकेकडून मालमत्ता कर थकबाकीदारांविरोधात कठोर पावले उचलण्यात येत असून थकीत रकमेची वसूली करण्यासाठी जप्ती मोहिमेला वेग देण्यात आला आहे. मा. आयुक्त श्री. जी. श्रीकांत यांच्या अधिपत्याखाली अतिरीक्त आयुक्त श्रीमती कल्पिता पिंपळे व उपआयुक्त विकास नवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू आहे.

महानगरपालिका अधिनियमातील नियम-42, पोटनियम-1 अंतर्गत थकबाकीदारांनी कर भरण्यास असमर्थता दर्शविल्यामुळे दिनांक 22 व 23 मार्च 2026 रोजी विविध झोनमधील मालमत्ता सील करण्यात आल्या. यामध्ये उस्मानपुरा, रेल्वेस्टेशन परिसर व हर्सूल येथील मालमत्तांचा समावेश आहे.

कारवाईतील ठळक बाबी :

व्यंकटेश प्लाझा (उस्मानपुरा) येथील मालमत्ता – ₹2,08,480 थकबाकी

प्लॉट क्र.26, रेल्वेस्टेशन – ₹2,05,988 थकबाकी

यतस्वीर कॉम्प्लेक्स, उस्मानपुरा – ₹2,86,135 थकबाकी

रमाईनगर, हर्सूल येथील घर – ₹3,57,390 थकबाकी

मनपाच्या माहितीनुसार, 4 मार्च 2026 पासून आतापर्यंत एकूण ₹8,00,69,432 इतक्या थकबाकीवर 51 व्यावसायिक मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, मार्च महिन्याचे वसूली उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सर्व झोन कार्यालये सुरू ठेवण्यात आली असून करदात्यांना मालमत्ता कर व पाणीपट्टी भरण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महानगरपालिकेने सर्व करदात्यांना आवाहन केले आहे की, थकीत कराचा तात्काळ भरणा करून जप्तीची कारवाई टाळावी आणि शहर विकासासाठी सहकार्य करावे.

 “कर भरा, नाहीतर कारवाईला सामोरे जा” – मनपाचा स्पष्ट इशारा!