कर थकबाकीदारांना मनपाचा दणका! १८ मालमत्तांवर कारवाई; २० लाखांचा कर वसूल

कर थकबाकीदारांना मनपाचा दणका! १८ मालमत्तांवर कारवाई; २० लाखांचा कर वसूल
कर थकबाकीदारांना मनपाचा दणका! १८ मालमत्तांवर कारवाई; २० लाखांचा कर वसूल

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. २४ : मालमत्ताकराची थकबाकी न भरणाऱ्या मालमत्ताधारकांविरोधात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे. आज विविध झोनमधील कर वसुली पथकांनी थकीत मालमत्तांवर कारवाई करत एकूण २० लाख रुपयांचा कर वसूल केला.

मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी थकीत मालमत्ताकर तातडीने भरून जप्तीची कारवाई टाळण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त (कर निर्धारक व संकलक) विकास नवाळे यांनी सर्व झोन कार्यालयांतील कर वसुली पथकांना थकबाकीदारांच्या याद्या देऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

त्यानुसार आज विविध झोनमध्ये कारवाई करण्यात आली. झोन १च्या पथकाने दोन मालमत्तांवर कारवाई करून २ लाख रुपये वसूल केले. झोन २मध्ये तीन मालमत्तांवर कारवाई करून २ लाख रुपये वसूल करण्यात आले. झोन ४च्या पथकाने चार मालमत्ता सील केल्या.

झोन ७च्या पथकाने तीन मालमत्ता सील करून ४ लाख रुपयांचे धनादेश घेतले. झोन ९च्या पथकाने चार मालमत्ता सील करून ५.२२ लाख रुपये वसूल केले, तर झोन १०च्या पथकाने दोन मालमत्ता सील करून ६.९४ लाख रुपयांचा कर वसूल केला.

महापालिकेच्या माहितीनुसार, आज एकूण १८ थकीत मालमत्ताधारकांवर कारवाई करण्यात आली असून सुमारे २० लाख रुपयांचा कर वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, आतापर्यंत मनपाच्या कर वसुली पथकांनी तब्बल १३४ मालमत्तांवर सीलिंगची कारवाई केली आहे.

थकबाकी न भरल्यास मालमत्ता विक्रीचा इशारा

मालमत्ताकराची संपूर्ण थकीत रक्कम भरल्याशिवाय सील करण्यात आलेल्या मालमत्तांचे सील उघडले जाणार नसल्याचे आयुक्त अमोल येडगे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, विहित मुदतीत थकीत रक्कम न भरल्यास जप्त केलेल्या मालमत्तांची विक्री करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

त्यामुळे इतर थकीत मालमत्ताधारकांनी तातडीने मालमत्ताकर भरून जप्ती व सीलिंगची कारवाई टाळावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड | जनतेसाठी समर्पित