एसटीतील दिव्यांगांच्या समस्यांवर काँग्रेस दिव्यांग सेलचे निवेदन; NCMC, शिवनेरी सवलत, व्हीलचेअर व राखीव जागांची मागणी

एसटीतील दिव्यांगांच्या समस्यांवर काँग्रेस दिव्यांग सेलचे निवेदन; NCMC, शिवनेरी सवलत, व्हीलचेअर व राखीव जागांची मागणी
एसटीतील दिव्यांगांच्या समस्यांवर काँग्रेस दिव्यांग सेलचे निवेदन; NCMC, शिवनेरी सवलत, व्हीलचेअर व राखीव जागांची मागणी

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि२६ :- काँग्रेस दिव्यांग सेलच्या वतीने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना दिव्यांग प्रवाशांच्या विविध समस्यांबाबत निवेदन देण्यात आले. शहराध्यक्ष मिर्झा झकी बेग यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या या निवेदनात दिव्यांगांना अधिक सुलभ व सन्मानजनक प्रवासासाठी विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.

निवेदनात दिव्यांगांसाठी NCMC (National Common Mobility Card) नोंदणी व नूतनीकरण प्रक्रिया तातडीने सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच कार्ड जारी करण्यासाठी लागणारी यंत्रणा (मशीन) एजंटांऐवजी दिव्यांग संस्था किंवा समाजसेवकांना मोफत उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून एजंटांकडून होणारी अवैध आर्थिक वसुली थांबेल, अशी मागणी करण्यात आली.

याशिवाय, राज्य शासनाच्या निर्णयानुसार बसस्थानकांवरील दिव्यांगांसाठी राखीव २०० चौ. फूट दुकानांच्या टेंडर प्रक्रियेला तातडीने सुरुवात करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

शिवनेरी बस सेवेत UDID कार्डधारक दिव्यांगांना प्रवास सवलत लागू करावी तसेच छत्रपती संभाजीनगर विभागातील एसटी बसमधील दिव्यांगांसाठी राखीव जागांची संख्या ४ वरून ८ करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.

तसेच सर्व प्रमुख बसस्थानकांवर आणि बसेसमध्ये व्हीलचेअर सुविधा उपलब्ध करून देण्यासह, ऑनलाईन तिकीट बुकिंगसाठी एसटीच्या मोबाईल अॅपमध्ये दिव्यांगांसाठी स्वतंत्र व सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.

या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन दिव्यांग प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा काँग्रेस दिव्यांग सेलने व्यक्त केली.

निवेदनावर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये शहराध्यक्ष मिर्झा झकी बेग, जिल्हाध्यक्ष अब्दुल मुदस्सीर अन्सारी आणि पूर्व विधानसभा अध्यक्ष शेख शाहरुख यांचा समावेश आहे.