‘एक वर्ष सोनं खरेदी करू नका’;पेट्रोल-डिझेल वाचवा, मेट्रो वापरा; पंतप्रधान मोदींचा नागरिकांना सल्ला
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १० :- हैदराबाद येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान Narendra Modi यांनी देशासमोर उभ्या राहणाऱ्या संभाव्य आर्थिक आणि ऊर्जा संकटांचा उल्लेख करत नागरिकांना इंधन बचतीचे आवाहन केले. पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याबरोबरच सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
मोदी म्हणाले की, ज्या शहरांमध्ये मेट्रो सेवा उपलब्ध आहे, तेथील नागरिकांनी शक्य तितका प्रवास मेट्रोने करावा. आवश्यक असल्यास कारपूलचा पर्याय स्वीकारावा, जेणेकरून इंधनाची बचत होईल. मालवाहतुकीसाठी रेल्वेचा अधिक वापर करण्याचेही त्यांनी सुचवले. इलेक्ट्रिक रेल्वे सेवेमुळे पेट्रोल-डिझेलवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.
याशिवाय विदेशी मुद्रा साठा जपण्यासाठी नागरिकांनी काही काळ सोन्याची खरेदी टाळावी, असेही पंतप्रधानांनी आवाहन केले. मोठ्या प्रमाणावर होणारी सोन्याची आयात देशाच्या विदेशी चलनावर ताण निर्माण करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मोदींच्या या वक्तव्यामुळे देशभरात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी याला दूरदृष्टीचा निर्णय म्हटले आहे, तर काहींनी सामान्य नागरिकांवरील वाढत्या आर्थिक दबावाचे संकेत असल्याची चर्चा सुरू केली आहे.
देशहितासाठी इंधन बचत आणि खर्चावर नियंत्रण आवश्यक आहे का? यावर आता जनतेत मोठी चर्चा रंगू लागली आहे.