एका बातमीने पेटवली ज्ञानदानाची ज्योत; प्राचार्य ग.ह. राठोड सरांकडून १५० पुस्तकांचे प्रेरणादायी दान

एका बातमीने पेटवली ज्ञानदानाची ज्योत; प्राचार्य ग.ह. राठोड सरांकडून १५० पुस्तकांचे प्रेरणादायी दान

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. ९ :- छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू असलेल्या “पुस्तक दान करा, विचारांची क्रांती घडवा” या समाजजागृती अभियानाला दिवसेंदिवस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, या उपक्रमाने आता लोकचळवळीचे रूप धारण केले आहे.

दैनिक लोकमत मधील या अभियानाची बातमी वाचल्यानंतर शिक्षणक्षेत्रातील संवेदनशील व्यक्तिमत्त्व प्राचार्य ग.ह. राठोड सर भावूक झाले. “ज्ञान हीच समाज परिवर्तनाची खरी ताकद” या भावनेतून त्यांनी कोणतीही औपचारिकता न ठेवता समाजभूषण रामदास वाघमारे यांच्याकडे तब्बल १५० पुस्तके सुपूर्द केली.

ही पुस्तके म्हणजे केवळ कागदांचा गठ्ठा नसून, ती अनेक विद्यार्थ्यांच्या भविष्यात प्रकाश टाकणारे दिवे ठरणार आहेत. एखाद्या गरजू विद्यार्थ्याच्या हातात हे पुस्तक पडून त्याच्या विचारांना चालना मिळेल, स्वप्नांना दिशा मिळेल आणि आयुष्याला नवा मार्ग सापडेल—याच सामाजिक जाणिवेतून हे दान करण्यात आले.

आजच्या डिजिटल युगात अनेकदा पुस्तके कपाटातच मर्यादित राहतात; मात्र राठोड सरांनी त्या पुस्तकांना नवसंजीवनी दिली. त्यांनी दाखवून दिले की, शिक्षकाची खरी भूमिका वर्गखोलीपलीकडे जाऊन समाजातील ज्ञानाची भूक ओळखून ती भागवण्यात आहे.

रामदास वाघमारे यांनी राठोड सरांचे आभार मानत सांगितले की, अशा दानशूर व्यक्तींमुळेच हे अभियान १० हजार पुस्तक संकलनाच्या उद्दिष्टाकडे वेगाने वाटचाल करत आहे.

👉 चला, आपणही या ज्ञानयज्ञात सहभागी होऊया…

कारण एक पुस्तक दान म्हणजे—एका विचाराला पंख देणे, एका विद्यार्थ्याच्या भविष्याला दिशा देणे आणि समाजात शांतपणे क्रांती घडवणे!