आयुक्तांच्या पाहणीनंतर मनपाची धडक कारवाई; आसिफिया कॉलनीत ३९ अनधिकृत नळ जोडण्या खंडित
१० हजारांचा दंड वसूल; पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांना मनपाचा कडक इशारा
छत्रपती संभाजीनगर, दि. २४ :- शहरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासोबतच पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने अनधिकृत नळ जोडण्यांविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. गुरुवारी सकाळी मनपा आयुक्त अमोल येडगे शहर पाहणी दौऱ्यावर असताना रस्त्यावर मोठ्या प्रमाणात स्वच्छ पाणी वाहत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याची गंभीर दखल घेत आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले.
आयुक्तांच्या निर्देशानुसार बेगमपुरा रोडवरील घाटी रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या आसिफिया कॉलनी परिसरात मनपाच्या पथकाने विशेष कारवाई केली. परिसरातील २५० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरून घेण्यात आलेल्या ३९ अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या. या जोडण्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहून जात असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते.
पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करत १० हजार रुपयांचा दंड जागेवरच वसूल करण्यात आला. शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेवर अनधिकृत जोडण्यांचा होणारा परिणाम आणि पाण्याची होणारी नासाडी रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली.
ही कारवाई अतिरिक्त आयुक्त-२ कल्पिता पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कार्यकारी अभियंता दत्तात्रय गायकवाड, उपअभियंता मिलिंद भामरे, कनिष्ठ अभियंता सचिन वेलदोडे, पथक अभियंता रोहित इंगळे यांच्यासह अनधिकृत नळ शोध पथकाचे कर्मचारी आणि नागरी सहाय्यक पथक सहभागी झाले होते.
महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या अनधिकृत नळ जोडण्या तसेच पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई केली जाणार आहे. पाणी ही सार्वजनिक संपत्ती असून त्याचा अपव्यय किंवा बेकायदेशीर उपसा कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड | जनतेसाठी समर्पित