आंतरमहाविद्यालयीन हॉकी स्पर्धेत इकरा एच. जे. थीम कॉलेजचा दबदबा; जळगाव विभागाचे अजिंक्यपद पटकावले

आंतरमहाविद्यालयीन हॉकी स्पर्धेत इकरा एच. जे. थीम कॉलेजचा दबदबा; जळगाव विभागाचे अजिंक्यपद पटकावले
आंतरमहाविद्यालयीन हॉकी स्पर्धेत इकरा एच. जे. थीम कॉलेजचा दबदबा; जळगाव विभागाचे अजिंक्यपद पटकावले

जळगाव दि २ :- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जळगाव विभागांतर्गत आयोजित आंतरमहाविद्यालयीन हॉकी स्पर्धेत इकरा शिक्षण संस्था संचलित एच. जे. थीम कला व विज्ञान महाविद्यालय, मेहरून, जळगावच्या संघाने दमदार कामगिरी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. मु. जे. महाविद्यालयाच्या मैदानावर ही स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

स्पर्धेच्या आयोजनावेळी इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार अध्यक्षस्थानी होते. सचिव एजाज मलिक, मजीद सेट जकरिया, डॉ. संजय चौधरी, डॉ. अनिता कोल्हे, डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, डॉ. उमेश पाटील, डॉ. वानखेडे, प्राचार्य डॉ. वकार शेख, डॉ. तनवीर खान, डॉ. अंजली कुलकर्णी, डॉ. अमिन काझी, अशफाक पठाण, फरहान शेख यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. डॉ. चांद खान यांनी केले. प्राचार्य डॉ. वकार शेख यांनी उपस्थितांचे आभार मानले. डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांच्या हस्ते टॉस करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.

इकराचा अंतिम सामन्यातही विजय

पहिल्या सामन्यात इकरा एच. जे. थीम महाविद्यालयाच्या संघाचा सामना रावेर महाविद्यालयाशी झाला. या सामन्यात इकरा संघाने दोन गोल करत विजय मिळवला.

दुसऱ्या सामन्यात नूतन मराठा महाविद्यालयाने एम. जे. महाविद्यालय, जळगावचा सामना करत दोन गोल नोंदवत विजय मिळवला.

यानंतर झालेल्या अंतिम सामन्यात इकरा एच. जे. थीम महाविद्यालय आणि नूतन मराठा महाविद्यालयाचे संघ आमनेसामने आले. अटीतटीच्या या सामन्यात इकरा संघाने आक्रमक आणि नियोजनबद्ध खेळाचे प्रदर्शन करत दोन गोल नोंदवले. अखेर इकराने सामना जिंकत जळगाव विभागाचे अजिंक्यपद पटकावले.

मुलींच्या गटातही रंगले सामने

मुलींच्या हॉकी स्पर्धेतही खेळाडूंनी उल्लेखनीय कौशल्य दाखवत प्रेक्षकांची दाद मिळवली. पहिल्या सामन्यात PGUG संघाने रावेर महाविद्यालयावर दोन गोलने विजय मिळवला. त्यानंतर एम. जे. कॉलेज आणि बेंडाळे महिला महाविद्यालय यांच्यात सामना झाला. या सामन्यात बेंडाळे महिला महाविद्यालयाने बाजी मारली.

मुलींच्या गटातील अंतिम सामना चुरशीचा झाला. या सामन्यात UGPG संघाने विजय मिळवत विजेतेपद पटकावले.

पंच व आयोजन समितीचे योगदान

प्रा. डॉ. आसिफ खान यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. आरिफ कुरेशी, अकबर खान, इम्रान बिस्मिल्ला आणि शाहबाझ यांनी पंच म्हणून जबाबदारी सांभाळली.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मु. जे. महाविद्यालयातील कर्मचारी तसेच इकरा महाविद्यालयाचे सय्यद वसीम अली, रफीक शेख आणि इतर सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. इकरा एच. जे. थीम महाविद्यालयाच्या संघाच्या या विजयानंतर महाविद्यालय परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

अखलाख देशमुख - महाराष्ट्र वाणी न्यूज