अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेची जिल्ह्यात 99,648 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर; आधार प्रमाणीकरण तातडीने करा!

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेची जिल्ह्यात 99,648 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर; आधार प्रमाणीकरण तातडीने करा!

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि. २५ :- 

राज्य शासनाच्या "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026" अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 1,276 गावांमधील तब्बल 99 हजार 648 पात्र शेतकऱ्यांची पहिली लाभार्थी यादी शासनाच्या अधिकृत पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही माहिती जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांनी दिली.

योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण (e-KYC) आणि अग्रीस्टॅक (AgriStack) नोंदणी तातडीने पूर्ण करणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच ही प्रक्रिया सुरू असल्यामुळे पुढील टप्प्यात लाभार्थ्यांच्या संख्येत आणखी वाढ होणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

प्रसिद्ध करण्यात आलेली लाभार्थी यादी संबंधित बँक शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, CSC केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र (ASSK), ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय तसेच सहायक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रथम लाभार्थी यादीत आपले नाव असल्याची खात्री करावी. त्यानंतर जवळच्या CSC किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन अंगठ्याच्या बायोमेट्रिकद्वारे आधार प्रमाणीकरण करावे. यावेळी मूळ आधार कार्ड आणि बचत खात्याचे पासबुक सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे.

जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांनी शेतकऱ्यांना कोणताही विलंब न करता आधार प्रमाणीकरण आणि अग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी संबंधित बँक शाखा, सहकारी संस्था किंवा जिल्हा उपनिबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.

प्रशासनाच्या माहितीनुसार, राज्यभर ही योजना टप्प्याटप्प्याने राबविण्यात येत असून आधार संलग्नीकरण, आधार प्रमाणीकरण आणि अग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण झाल्यानंतरच कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.