"२४ जुलैला महाराष्ट्र थांबेल! प्रहार संघटनेचा चक्काजाम आंदोलनाचा निर्धार"

"२४ जुलैला महाराष्ट्र थांबेल! प्रहार संघटनेचा चक्काजाम आंदोलनाचा निर्धार"

महाराष्ट्र वाणी न्युज 

१९ जुलै :- राज्यातील शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार आणि विविध घटकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. २४ जुलै रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा आमदार बच्चू कडू यांनी केली आहे.

बच्चू कडू यांनी स्पष्ट शब्दांत सरकारवर टीका करताना म्हटले की, “सरकारने कर्जमाफीसंदर्भात नेमलेली समिती ही केवळ लोकांचा रोष थोपवण्यासाठीची एक दिखाऊ पायरी आहे. या समितीच्या कामकाजातून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी कोणतीही आशा वाटत नाही. केवळ थातुरमातुर उत्तरं देऊन वेळ मारून नेली जात आहे.”

या पार्श्वभूमीवर आता शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, अपंग बांधव यांनी एकत्र येऊन रस्त्यावर उतरण्याची वेळ आल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. “चक्काजाम होणारच,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

या आंदोलनात राज्यभरातून हजारो लोक सहभागी होणार असल्याची शक्यता आहे. शासनाने तातडीने ठोस निर्णय न घेतल्यास, जनतेचा उद्रेक रोखता येणार नाही, असा इशाराही प्रहार संघटनेतर्फे देण्यात आला आहे.

एकत्र येऊया, आवाज उठवूया — चक्काजाम यशस्वी करूया!– प्रहार जनशक्ती पक्ष