हरवलेल्या तीन चिमुकल्यांची सुखरूप सुटका; मनमाड पोलिसांच्या धाडसी कामगिरीचे सहकार मंत्र्यांकडून कौतुक
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. १६ :- नाशिक जिल्ह्यातील सातपूर परिसरात वास्तव्यास असलेल्या हरवलेल्या तीन बालकांची सुखरूप सुटका करण्यात मनमाड पोलीस प्रशासनाला यश आले असून या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी पोलिसांचे जाहीर कौतुक केले आहे.
या प्रकरणात मनमाड पोलीस स्टेशनचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन, पोलीस निरीक्षक विजय करे, तसेच प्राची मोरे आणि त्यांच्या संपूर्ण पथकाने तत्परता दाखवत अल्पावधीत हरवलेल्या तीन बालकांचा शोध लावला. पोलिसांनी चिमुकल्यांना सुरक्षितपणे त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करून एक संवेदनशील प्रकरण यशस्वीरीत्या हाताळले.
माहिती मिळताच पोलिसांनी विलंब न लावता तपासाची चक्रे फिरवत विविध ठिकाणी शोधमोहीम राबवली. मुलांच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेत अत्यंत कौशल्याने ही कारवाई पार पाडण्यात आली. मुलांना त्यांच्या आई-वडिलांच्या कुशीत पुन्हा परतवून देत पोलिसांनी ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्याचा खरा अर्थ कृतीतून दाखवून दिला.
या कामगिरीबद्दल सहकार मंत्री पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांचे अभिनंदन करत, “पोलीस दलातील अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांमुळेच समाजात सुरक्षिततेची भावना अधिक दृढ होते. बाजीराव महाजन आणि विजय करे यांच्या कार्याचा आम्हाला अभिमान आहे,” असे गौरवोद्गार काढले.
हरवलेली मुले सुखरूप घरी परतल्यावर पालकांच्या डोळ्यांतील आनंद हा कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठा असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच या यशस्वी मोहिमेबद्दल संपूर्ण मनमाड पोलीस पथकाचे त्यांनी पुन्हा एकदा अभिनंदन केले.
— वाचा, शेअर करा आणि समाजातील सकारात्मक कामगिरीला बळ द्या —