सेवाविषयक प्रलंबित प्रकरणांचा निपटारा! महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, औरंगाबाद येथे लोक अदालतीद्वारे ३८ प्रकरणे निकाली!

सेवाविषयक प्रलंबित प्रकरणांचा निपटारा! महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, औरंगाबाद येथे लोक अदालतीद्वारे ३८ प्रकरणे निकाली!
सेवाविषयक प्रलंबित प्रकरणांचा निपटारा! महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, औरंगाबाद येथे लोक अदालतीद्वारे ३८ प्रकरणे निकाली!

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. २१ जून :- महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, खंडपीठ औरंगाबाद येथे आज दिनांक २१ जून २०२५ रोजी सेवाविषयक प्रलंबित प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. ही लोक अदालत महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व उच्च न्यायालय विधी सेवा उप समिती औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडली.

या लोक अदालतीचे उद्घाटन मा. उच्च न्यायालयाचे माजी न्यायमुर्ती वि.का. जाधव (उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, औरंगाबाद) यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी प्रशासकीय सदस्य विनय कारगांवकर, न्यायिक सदस्य ए.एन. करमरकर, वकील संघाचे अध्यक्ष अॅड. डी.टी. देवणे, सचिव अॅड. के. बी. जाधव, मुख्य सादरकर्ता अधिकारी महेश भारस्वाडकर, प्रभारी प्रबंधक संदीप मुंडे, पॅनल सदस्य, शासकीय अधिकारी आणि पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आजच्या लोक अदालतीत एकूण १७५ सेवाविषयक प्रकरणे सुनावणीस ठेवण्यात आली होती. यापैकी तब्बल ३८ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली, ही संख्यात्मक प्रगती उल्लेखनीय ठरली आहे.

लोक अदालतीचे पॅनल प्रमुख म्हणून श्री. विनय कारगांवकर आणि श्री. ए.एन. करमरकर यांनी तर पॅनल सदस्य म्हणून श्री. एस.जी. शेटे, श्री. एस. के. कुलकर्णी, अॅड. एस. के. कदम व अॅड. पी.व्ही. बरडे यांनी भूमिका बजावली.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये न्यायाधिकरणातील सर्व अधिकारी, कर्मचारी, वकील संघाचे सदस्य, मुख्य व सादरकर्ता अधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

लोक अदालतीद्वारे न्यायप्रक्रिया अधिक वेगाने व परस्पर सहमतीने निकाली लागण्याचा मार्ग खुला होतो, याचे उत्तम उदाहरण म्हणून आजच्या कार्यक्रमाकडे पाहिले जात आहे.