सिल्लोडमध्ये शेतकरी आत्महत्याग्रस्त ३३ कुटुंबांना प्रत्येकी एक लाखांची मदत; ३३ लाखांचे धनादेश वितरित!
आमदार अब्दुल सत्तार यांचा पुढाकार; दिवाळी गोड करण्यासाठी आनंदाचा शिधा, शिलाई मशीन आणि विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप
सिल्लोड (प्रतिनिधी) दि ४ :- शेतकरी कुटुंबांच्या दुःखात सहभागी होत त्यांना आर्थिक आणि सामाजिक आधार देण्यासाठी आमदार अब्दुल सत्तार यांनी पुढाकार घेतला. सिल्लोड येथील तहसील कार्यालय परिसरात तालुक्यातील ३३ शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी एक लाख रुपये याप्रमाणे एकूण ३३ लाख रुपयांच्या मदतीचे धनादेश वितरित करण्यात आले. तसेच नैसर्गिक आपत्तीत जनावरे मृत झालेल्या २१ शेतकरी लाभार्थ्यांना ८ लाख ११ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण व्हावेत, या उद्देशाने विशेष मदत उपक्रम राबविण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या सहकार्य व मार्गदर्शनातून या कुटुंबांना आनंदाचा शिधा, महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी शिलाई मशीन, तर विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ये-जा करणे सोयीचे व्हावे म्हणून सायकलींचे वाटप करण्यात आले.
यावेळी लाभार्थी आणि नागरिकांशी संवाद साधताना आमदार अब्दुल सत्तार यांनी संकटाच्या काळात शासन आणि शिवसेना प्रत्येक कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याची ग्वाही दिली. शेतकरी बांधवांनी कोणत्याही संकटामुळे खचून जाऊ नये. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे भावनिक आवाहनही त्यांनी केले.
गरजू कुटुंबांपर्यंत मदतीचा हात पोहोचविणे आणि त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलविणे, यातच खरे आत्मिक समाधान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमास तहसीलदार सागर वाघमारे, नायब तहसीलदार तुकाराम बनकर, पुरवठा नायब तहसीलदार बळीराम मुंडे, तालुका कृषी अधिकारी संदीप जगताप, नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार, शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव पाटील तायडे यांच्यासह विविध पदाधिकारी, मान्यवर, लाभार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित