सिल्लोडमध्ये महसूल सप्ताहाचा आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते शुभारंभ; लाभार्थ्यांना धनादेश व प्रमाणपत्रांचे वाटप

सिल्लोडमध्ये महसूल सप्ताहाचा आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते शुभारंभ; लाभार्थ्यांना धनादेश व प्रमाणपत्रांचे वाटप
सिल्लोडमध्ये महसूल सप्ताहाचा आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते शुभारंभ; लाभार्थ्यांना धनादेश व प्रमाणपत्रांचे वाटप

महाराष्ट्र वाणी न्युज 

सिल्लोड (प्रतिनिधी)दि १ ऑगस्ट :– सिल्लोड येथील तहसील कार्यालयात महसूल दिन आणि महसूल सप्ताहाचा शुभारंभ आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते आज उत्साहात पार पडला. दिनांक 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या कालावधीत संपूर्ण तालुक्यात महसूल सप्ताह साजरा केला जाणार असून, या सप्ताहात शासकीय योजनांचे लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याबरोबरच नागरिकांच्या समस्या तत्परतेने सोडवाव्यात, असे निर्देश आमदार सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले.

या कार्यक्रमात महसूल विभागातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. याचवेळी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वारसांना तसेच गोपीनाथराव मुंडे अपघात विमा योजनेतील लाभार्थ्यांना शासकीय मदतीचे धनादेश प्रदान करण्यात आले. यासोबतच संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांना मंजुरीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, तहसीलदार सतीश सोनी, औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाढे, माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर, महसूल विभागातील अधिकारी-कर्मचारी, विविध गावांचे सरपंच, लाभार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महसूल सप्ताहाच्या निमित्ताने शासकीय यंत्रणा आणि सामान्य नागरिक यांच्यातील संवाद सशक्त होईल, तसेच नागरी सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचेल, असा विश्वास या कार्यक्रमातून व्यक्त करण्यात आला.

– सेवा तुमच्या दारी, प्रशासन तुमच्या पाठी!