सायबर फसवणुकीतही ‘गोल्डन अवर’ महत्त्वाचा – त्वरित तक्रार द्या, फसलेली रक्कम वाचवा : मुख्यमंत्री फडणवीस
महाराष्ट्र वाणी
मुंबई दि ३ :- रस्ता अपघातामध्ये ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळाल्यास अपघातग्रस्तांचे प्राण वाचू शकतात. त्याच धर्तीवर सायबर फसवणुकीतही ‘गोल्डन अवर’ महत्त्वाचा ठरतो. फसवणूक लक्षात आल्यानंतर जितक्या लवकर तक्रार केली जाते, तितक्या लवकर फसलेली रक्कम परत मिळविण्याची शक्यता वाढते. त्यामुळे नागरिकांनी तातडीने १९३० किंवा १९४५ या हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
राज्यात जागतिक स्तरावरील सायबर सिक्युरिटी लॅब, प्रतिसाद केंद्रे आणि रेग्युलेटरी यंत्रणा उभारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. डीपफेकसारख्या नव्या आव्हानांवर मात करण्यासाठी क्षमता आणि जनजागृती यांची एकत्रित गरज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
‘सायबर जनजागृती महा-ऑक्टोबर २०२५’ या कार्यक्रमाचे उद्घाटन मुंबई येथील महाराष्ट्र पोलीस मुख्यालयात त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ‘सायबर योद्धा’ या लहान मुलांसाठी तयार केलेल्या कॉमिक बुकलेटचे प्रकाशन आणि सायबर जनजागृतीसाठी काम करणाऱ्या सायबर वॉरियर्सचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बाल सिंह चहल, अभिनेता अक्षय कुमार, अभिनेत्री राणी मुखर्जी, व्हीजेटीआयचे डॉ. फारूक काझी, आयआयटी मुंबईचे प्रा. मंजेश हनवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सायबर सुरक्षिततेसाठी जागरूक राहा, त्वरित तक्रार द्या – हेच ‘गोल्डन अवर’चं सूत्र!