सरकार-आंदोलकांमध्ये समेट झाला, मग तिसऱ्या व्यक्तीची लुडबुड नको! – संजय राऊत

मराठा समाज समाधानी, मग तिसऱ्यांनी वाद पेटवू नयेत

सरकार-आंदोलकांमध्ये समेट झाला, मग तिसऱ्या व्यक्तीची लुडबुड नको! – संजय राऊत

महाराष्ट्र वाणी न्युज 

मुंबई दि ५ :- मराठा आंदोलनाबाबत सरकार आणि आंदोलकांमध्ये समेट झाल्यानंतर त्यावर तिसऱ्या व्यक्तीने अनावश्यक टीका किंवा लुडबुड करणे महाराष्ट्राच्या हिताचे नाही, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. शुक्रवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावरील उपोषण मागण्या मान्य झाल्यानंतर सोडले. आंदोलक समाधानी झाले आणि गुलाल उधळून गावी गेले. तरीही काही ठिकाणी विरोधी प्रतिक्रिया उमटत असल्याबाबत विचारले असता राऊत म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तोडगा काढला, तोडगा आंदोलकांनी स्वीकारला आणि ते समाधानी आहेत. अशावेळी बाहेरचे लोक उगाच वाद निर्माण करू नयेत.”

राऊत यांनी आणखी स्पष्ट केले की, मराठा समाज समाधानी आहे, ओबीसी समाजही समाधानी आहे. त्यामुळे समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य करणे योग्य नाही. “महाराष्ट्र शांत आहे, लोक अजूनही पेढे वाटत आहेत. आता वाद पेटवणे म्हणजे राज्याचे नुकसान करण्यासारखे आहे,” असे त्यांनी ठणकावले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रश्न संयमाने हाताळला, त्यांचे कौतुक करायलाच हवे, असे राऊत म्हणाले. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या मागण्या टप्प्याटप्प्याने पूर्ण होतील, असे विधान केले. यावर राऊत यांनी प्रत्युत्तर देताना सांगितले की, “जरांगे पाटील समाधानी आहेत, समाज समाधानी आहे. त्यामुळे इतरांनी अनावश्यक बोलून वातावरण बिघडवू नये.”