समृद्धी महामार्गात १५० कोटींचा घोटाळा? अंबादास दानवे यांचे थेट फडणवीसांना पत्र; C.I.D. चौकशीची मागणी!
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २४ :- यांनी समृद्धी महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या मोबदल्यात मोठ्या अनियमिततेचा आरोप करत थेट मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांना पत्र पाठवले आहे. या प्रकरणाची C.I.D. मार्फत सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
जटवाडा/जोगवाडा (ता. छत्रपती संभाजीनगर) येथील सुमारे ३ एकर ३ गुंठे जमीन हैदराबाद संस्थानकडून १९५७ साली के. पावण्या भिका वाघमारे यांच्या नावे बहाल करण्यात आली होती. पुढे ती जमीन महाराष्ट्र विकास महामंडळाकडे संपादित करण्यात आली. या जमिनीच्या मूळ वारसदारांना हैदराबाद कुळ कायदा १९५० च्या कलम ३८(य) अंतर्गत केवळ १,१५० रुपयांचा मोबदला अनुज्ञेय असल्याचे नमूद आहे.
मात्र, पुढील घडामोडीत १९७१ साली हैदराबाद (हिबानामा) मार्फत २३ एकर जमीन जावेद रसूल शेख यांच्या नावे बहाल झाल्याची नोंद असल्याचा दावा करण्यात आला आहे. संबंधित जमीन आजच्या घडीला सुमारे १५० कोटी रुपयांच्या बाजारमूल्याची असल्याचे सरकारी दप्तरी नमूद आहे.
जन्म १९८५... मग १९७१ मध्ये जमीन कशी?
दानवे यांनी पत्रात नमूद केले आहे की, जावेद रसूल शेख यांचा जन्म १९८५ सालचा असल्याची माहिती उपलब्ध आहे. मग १९७१ साली त्यांच्या नावे २३ एकर जमीन कशी बहाल झाली? असा गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. हा व्यक्ती सत्तारूढ पक्षातील एका खासदाराचा वाहनचालक असल्याचा आरोपही पत्रात करण्यात आला आहे.
शासनाची फसवणूक?
या प्रकरणात सुमारे १.१५० कोटी रुपयांचा (आजच्या बाजारभावानुसार अंदाजे १५० कोटी) गैरव्यवहार होण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे. यामध्ये संबंधित अधिकारी, हिबानामा करणारी व्यक्ती आणि पाठीराखे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पूर्वीही संशयास्पद व्यवहार
संभाजीनगरातील काल्डा कॉर्नर येथील जमिनीच्या हिबानाम्यातही संबंधित व्यक्तीचे नाव समोर आले होते. त्या प्रकरणात पोलीस चौकशी होऊनही ठोस कारवाई झाली नसल्याचे दानवे यांनी नमूद केले आहे.
हेच पत्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनाही पाठविण्यात आले आहे.
समृद्धी महामार्गातील जमीन व्यवहारात नेमके सत्य काय? १५० कोटींचा हा खेळ उघड होणार का? राज्यभरात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे!