समाजसेवक व शिक्षणतज्ञ मिर्झा अब्दुल कय्यूम नदवी यांना ‘राष्ट्रीय सामाजिक उत्कृष्टता पुरस्कार-2025’
महाराष्ट्र वाणी न्युज
नवी दिल्ली/औरंगाबाद दि १० :– शिक्षण आणि समाजसेवा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल औरंगाबादचे प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते मिर्झा अब्दुल कय्यूम नदवी यांना ‘राष्ट्रीय सामाजिक उत्कृष्टता पुरस्कार-2025’ ने सन्मानित करण्यात आले आहे. हा मानाचा पुरस्कार त्यांना एसोसिएशन ऑफ मुस्लिम प्रोफेशनल्स (AMP) तर्फे आयोजित पाचव्या राष्ट्रीय पुरस्कार समारंभात ‘सोसायटी अँड नेशन बिल्डिंग’ या क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल प्रदान करण्यात आला.
हा वार्षिक पुरस्कार सोहळा “शांती आणि प्रगतीसाठी प्रयत्न” या संकल्पनेवर आधारित असून, देशभरात सकारात्मक बदल घडवणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यात येतो. यावर्षी मिर्झा नदवी यांचा सन्मान त्यांच्या समाजाभिमुख कार्यावरील अढळ बांधिलकीचे प्रतिक ठरला आहे.
‘रीड अँड लीड फाऊंडेशन’तर्फे अभिनव उपक्रम
मिर्झा अब्दुल कय्यूम नदवी हे औरंगाबादमधील रीड अँड लीड फाऊंडेशन चे अध्यक्ष असून, शिक्षण प्रसारासाठी राबवलेल्या त्यांच्या अभिनव मोहिमांसाठी ते विशेष प्रसिद्ध आहेत. त्यापैकी ‘मोहल्ला बाल वाचनालय अभियान’ हा उपक्रम लक्षणीय ठरला आहे. झोपडपट्टी व वस्त्यांतील मुलांना वाचनासाठी पुस्तके उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमाची सुरुवात त्यांच्या कन्या मरियम मिर्झा हिने स्वतःच्या काही पुस्तकांमधून केली होती, जी पुढे मोठ्या चळवळीत रूपांतरित झाली.
वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी त्यांनी मुलांना ‘गुल्लक’ (पिग्गी बँक) देण्याचा उपक्रम राबवला आहे, ज्यायोगे मुले स्वतःच्या बचतीतून पुस्तके खरेदी करतात. त्यामुळे मुलांना बचतीचे महत्त्वही कळते.
लेखक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते
नदवी यांनी शिक्षण, इतिहास व राजकारण या विषयांवर 250 हून अधिक लेख प्रकाशित केले आहेत. तसेच ते ‘ऑल महाराष्ट्र मुस्लिम तेली समाज’ चे अध्यक्ष असून अनेक मुस्लिम संस्थांमध्ये महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडत आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी एम.ए. पदवी मिळवली असून, लखनौ येथील नदवत-उल-उलेमा मधून त्यांनी ‘आलिम’ व ‘फाजिल’ ही पदवीही संपादन केली आहे. पूर्वीही त्यांना “आम्ही भारती”सह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
AMP कडून मिळालेला हा पुरस्कार त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याला नव्या उंचीवर नेणारा ठरला आहे.
“ज्ञान आणि समाजसेवेच्या माध्यमातून राष्ट्रनिर्माणाचे कार्य करणारे मिर्झा नदवी आज अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत.”