शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी! आता दुसऱ्याच्या शेतातून पाइपलाइन नेण्याचा मार्ग होणार मोकळा? आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांचे महसूलमंत्र्यांना साकडे!

शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी! आता दुसऱ्याच्या शेतातून पाइपलाइन नेण्याचा मार्ग होणार मोकळा? आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांचे महसूलमंत्र्यांना साकडे!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २२ :- शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देताना दुसऱ्याच्या शेतातून पाइपलाइन नेण्याचा प्रश्न अनेकदा वादाचे कारण ठरत आहे. काही शेतकरी पाइपलाइन टाकण्यास विरोध करतात, तर काहींकडून अवाजवी पैशांची मागणी केली जाते. एवढेच नव्हे, तर शेतात टाकलेल्या पाइपलाइन फोडण्याचे प्रकारही घडत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. या गंभीर प्रश्नावर आता मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे विधान परिषद सदस्य आ. डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.

यासंदर्भात त्यांनी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना २१ नोव्हेंबर रोजी निवेदन देऊन शेतकऱ्यांना इतरांच्या शेतातून पाइपलाइन नेण्यासाठी कायदेशीर परवानगी देण्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्र शासनाने यापूर्वी शेत व पाणंद रस्त्यांसाठी 'ग्रामसमृद्धी अभियान' राबविले होते. त्याच धर्तीवर शेतकऱ्यांच्या पाइपलाइनच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात यावे, अशी मागणी डॉ. पाटील यांनी केली आहे.

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४९(१) लागू करण्याची मागणी

डॉ. पाटील यांनी आपल्या निवेदनात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ च्या कलम ४९(१) अन्वये शेतकऱ्यांना दुसऱ्या शेतकऱ्याच्या जमिनीतून पाइपलाइन नेण्यास मंजुरी देण्याची मागणी केली आहे. याशिवाय, यापूर्वी अडविण्यात आलेल्या पाइपलाइन पुन्हा सुरू करण्यासाठीही याच कायदेशीर तरतुदीनुसार परवानगी देण्यात यावी, असे त्यांनी म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे या मागणीची कितपत दखल घेतात आणि राज्य सरकार यावर कोणता निर्णय घेते, याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.

शेतकऱ्यांना कायदेशीर दिलासा मिळाल्यास सिंचनाचा मार्ग सुकर होण्यास मदत होऊ शकते.

महाराष्ट्र वाणी न्यूज | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित

या प्रकरणांमध्ये गावपातळीवर वाद वाढण्याऐवजी संबंधित तहसीलदारांनी तातडीने निर्णय घेऊन पाइपलाइन टाकण्यास परवानगी द्यावी. यासाठी महसूल विभागाने राज्यभरातील तहसीलदारांना स्पष्ट निर्देश द्यावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांची अडवणूक थांबणार का?

शेती बागायती करण्यासाठी पाण्याची व्यवस्था करणे ही शेतकऱ्यांची मूलभूत गरज आहे. मात्र, दुसऱ्याच्या शेतातून पाइपलाइन नेण्यावरून होणारे वाद, आर्थिक मागण्या आणि पाइपलाइनची तोडफोड यामुळे शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित