भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेत अभिवादन; बिरसा मुंडा विहीर योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश वाटप

भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेत अभिवादन; बिरसा मुंडा विहीर योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश वाटप
भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेत अभिवादन; बिरसा मुंडा विहीर योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश वाटप

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १५ :- जल, जंगल आणि जमीन या आदिवासींच्या हक्कांसाठी संघर्ष करणारे महान क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जितेंद्र जयस्वाल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. यांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेशांचे वाटप करण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या वेरूळ सभागृहात कृषी विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जितेंद्र जयस्वाल होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम., उपायुक्त तथा जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नानासाहेब कदम आणि जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जल, जंगल आणि जमीन यांसाठीच्या संघर्षाचा व योगदानाचा गौरव केला. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या माध्यमातून अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी कृषी विभागाने प्रभावी प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या. समाजातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमात बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना २०२५-२६ अंतर्गत लाभ घेतलेल्या दिनेश पुनमसिंग सिहीरे (रा. बेंदवाडी) आणि हरिचंद लाला ब्रम्हनाथ (रा. बेंबळ्याची वाडी, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) यांना उपाध्यक्ष जितेंद्र जयस्वाल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात धनादेश प्रदान करण्यात आले.

अध्यक्षीय भाषणात जितेंद्र जयस्वाल यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्याचा गौरव करताना सांगितले की, महान व्यक्तींचे विचार आणि त्याग अनेक शतकांनंतरही समाजाला प्रेरणा देत असतात. अशा महापुरुषांच्या कार्याची आठवण ठेवून त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे.

शालेय विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार रुजविण्याची गरज व्यक्त करताना त्यांनी सभागृहातील कार्यक्रमांना परिसरातील शाळांमधील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतल्यास त्यांना प्रेरणादायी विचार ऐकण्याची संधी मिळेल, असे मत मांडले. आजची पिढी मोठ्या प्रमाणात मोबाईलमध्ये गुंतलेली असल्याने शिक्षणासोबत बालसंस्कारांवरही विशेष भर देणे आवश्यक आहे. स्वामी समर्थ केंद्राच्या माध्यमातून बालसंस्काराचे कार्य केले जात असून शासनानेही या दिशेने प्रयत्न करावेत, असे त्यांनी नमूद केले.

भगवान बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंडमध्ये झाला असला, तरी त्यांच्या महान कार्यामुळे ते संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान बनले आहेत. महापुरुषांना कोणत्याही एका समाजाच्या किंवा चौकटीच्या मर्यादेत बांधता कामा नये. त्यांचे विचार सर्व समाजापर्यंत पोहोचले पाहिजेत, असेही जयस्वाल यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक कृष्णा बोरसे, डी. एस. जाधव, व्ही. जी. अधापुरे, कृषी अधिकारी पंचायत समिती छत्रपती संभाजीनगर, आर. व्ही. दीक्षित, कृषी अधिकारी पंचायत समिती गंगापूर, एस. एस. सरसमकर, विस्तार अधिकारी (कृषी), दिलीप निकम, सहाय्यक प्रशासन अधिकारी तसेच कृषी विभागातील श्री. जोशी, लाळे, जाधव यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कृषी अधिकारी प्रवीण सरकलवाड यांनी केले.

महाराष्ट्र वाणी | 

सत्यासाठी निर्भीड | जनतेसाठी समर्पित