"शेतकरी मरतोय, मंत्री रम्मी खेळतोय – आवाज उठवणाऱ्यांवर हल्ला; राष्ट्रवादी युवती काँग्रेसचा संतप्त जाहीर निषेध!"

महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २१ जुलै :- राज्यातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत असताना, मंत्र्यांचे ‘रम्मी’सारख्या खेळांमध्ये गुंग होणे हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी लाजिरवाणं असल्याची टीका राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा धनश्री तडवळकर यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या वेदना आणि मृत्यूंकडे दुर्लक्ष करत सत्ताधारी मजामस्ती करण्यात व्यग्र आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी करत एक संतप्त जाहीर निषेध व्यक्त केला.
धनश्री तडवळकर म्हणाल्या, “शेतकरी कर्जाच्या खाईत अडकून आत्महत्या करत आहे, आणि त्याचवेळी मंत्री मात्र रम्मी खेळण्यात व्यस्त आहेत. ही परिस्थिती केवळ असंवेदनशील नाही, तर लोकशाहीच्या मूल्यांनाही काळीमा फासणारी आहे.”
या प्रकरणात आणखी संतापजनक बाब म्हणजे, शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आवाज उठवणाऱ्यांवर थेट हल्ले केले जात आहेत. “शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहणं गुन्हा ठरत असेल, तर आम्ही हा गुन्हा सातत्याने करणार,” असा थेट इशाराही त्यांनी दिला.
तडवळकर यांनी पुढे सांगितले की, “हे केवळ शेतकऱ्यांचे नाही, तर सामान्य जनतेच्या भावनांवरच्या आघात आहे. लोकशाहीत विरोधी मत मांडणं हा अधिकार आहे. पण सत्तेच्या बळावर हा आवाज दाबण्याचा जो प्रयत्न केला जातोय, तो आम्ही कदापी सहन करणार नाही.”
राष्ट्रवादी युवती काँग्रेसची सरकारला इशारा :
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची गांभीर्याने दखल घ्या.
कर्जमाफी, पीकविमा व मदतीच्या रकमा त्वरित द्या.
निषेध करणाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांना अटक करा व कठोर कारवाई करा.
धनश्री तडवळकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “शेतकरी आणि सामान्य जनतेचा आवाज दाबण्याचा एकही प्रयत्न आम्ही सहन करणार नाही. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी झगडणाऱ्यांना दडपशाहीने गप्प करता येणार नाही.”
📢 "हे केवळ आंदोलन नाही, हा शेतकऱ्यांच्या न्यायाचा लढा आहे!"