शहर वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम : ४०८ रिक्षांवर कारवाई, तब्बल ₹९.३९ लाखांचा दंड आकारला! 🚔
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि. ३० :-
शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त मा. श्री सुधीर हिरेमठ यांच्या आदेशानुसार वाहतूक विभागाने विशेष मोहीम राबवली असून, या मोहिमेत तब्बल ४०८ रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
ही मोहीम आज (३० ऑक्टोबर) सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत शहरातील विविध चौकात राबविण्यात आली. कारवाईदरम्यान विना गणवेश, विना कागदपत्र, विना लायसन्स तसेच मद्यसेवन करून वाहन चालविणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई करण्यात आली.
एकूण ९२१ वाहनांवर कारवाई करून ₹९,३९,४०० दंड आकारण्यात आला, त्यापैकी ₹९२,१५० दंड वसूल करण्यात आला आहे.
ही संपूर्ण मोहीम मा. उप पोलीस आयुक्त श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. सुभाष भुजंग यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. शहर वाहतूक शाखा-१, वाहतूक शाखा वाळुज, सिडको, छावणी, व शहर वाहतूक शाखा-२ यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
पोलिसांनी यापुढेही अशाच प्रकारे नियमभंग करणाऱ्या दुचाकी, तीनचाकी व इतर वाहनचालकांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
वाहन चालकांना परवाना, कागदपत्रे सोबत ठेवणे, गणवेश परिधान करणे आणि वाहतुकीस अडथळा निर्माण न करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
वाहतूक नियमांचे पालन करा – सुरक्षित शहर, सुरक्षित प्रवास! 🚦