"विधानभवनात सत्ता तुमची, पण रस्त्यावर सत्ता आमची!" – राज ठाकरेंचा स्फोटक इशारा
महाराष्ट्र वाणी न्युज
मुंबई दि ५ जुलै(प्रतिनिधी) :- हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्रावरून राज्यात निर्माण झालेल्या वादळानंतर अखेर सरकारनं माघार घेतली आणि या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेच्या वतीने मुंबईत भव्य विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. वरळीतील डोम परिसरात झालेल्या या ऐतिहासिक मेळाव्यात तब्बल दोन दशकांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर एकत्र आले.
या मेळाव्यात बोलताना राज ठाकरेंनी सत्ताधारी भाजपावर थेट निशाणा साधत म्हणाले, "तुमच्या हातात विधानभवनात सत्ता असेल, पण रस्त्यावरची खरी सत्ता आमच्याकडे आहे!" असा थेट इशारा दिला.
राज ठाकरे पुढे म्हणाले, "खरं तर आज मोर्चा निघायला हवा होता. पण केवळ मोर्चाच्या चर्चांमुळेच सरकारनं निर्णय मागे घेतला, हेच पुरेसं आहे. बाळासाहेब ठाकरेंना जे शक्य झालं नाही, ते आज आमच्यात एकत्र येऊन दाखवणं — हे खरं नेतृत्व आहे आणि देवेंद्र फडणवीस यांचं हे एक ऐतिहासिक यश आहे, हे मी मान्य करतो!"
ते म्हणाले, "या मेळाव्याला कुठलाही झेंडा नाही, कारण अजेंडा एकच — ‘मराठी’! आमचं अस्तित्व, आमची भाषा आणि आमचं महाराष्ट्र कोणाच्याही अधीन राहणार नाही. शिक्षणावर असा जबरदस्तीचा निर्णय कोणी घेतो, शिक्षणतज्ज्ञांचा सल्ला न घेता का लादतो? केवळ सत्ता आहे म्हणून असा निर्णय चालणार नाही."
या घमासान राजकीय वातावरणात ठाकरे बंधूंच्या एकत्रित सभेने मराठी जनतेत नवचैतन्य निर्माण केलं आहे. महाराष्ट्रातील जनतेचा आवाज पुन्हा एकदा रस्त्यावर घुमतोय, असं दृश्य या मेळाव्याच्या माध्यमातून स्पष्टपणे पाहायला मिळालं.
‘हीच ती वेळ आहे’ – मराठी माणूस पुन्हा उठून उभा राहत आहे!