‘लाडकी बहीण’ योजनेत अडथळा! अनेक महिलांना E-KYC करता येणार नाही — 1500 रुपयांचा लाभ थांबण्याची शक्यता?
महाराष्ट्र वाणी न्युज
मुंबई दि १२ :- राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी “मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना” ही महिलांसाठीचा एक मोठा आधारस्तंभ ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1500 चा आर्थिक लाभ दिला जातो. आतापर्यंत एकूण 14 हप्ते वितरित करण्यात आले असून, 15 वा हप्ता सध्या लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जात आहे. दिवाळीपूर्वी हा हप्ता मिळाल्याने महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मात्र, या आनंदावर आता सावली पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासनाकडून E-KYC प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली असून, ज्यांनी केवायसी पूर्ण केली नाही, त्या महिलांना योजनेचा पुढील लाभ मिळणार नाही, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली आहे.
शासनाने केवायसीसाठी नोव्हेंबर अखेरपर्यंतची मुदत दिली आहे. परंतु, ओटीपी एरर, सर्व्हर डाऊन आणि नेटवर्क समस्यांमुळे अनेक महिलांना ही प्रक्रिया पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे पात्र महिलाही लाभापासून वंचित राहतील की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
केवायसी दरम्यान विवाहित महिलांना पतीचा आधार क्रमांक, तर अविवाहित महिलांना वडिलांचा आधार क्रमांक नमूद करणे बंधनकारक आहे. पण अशा अनेक महिला आहेत ज्यांचे वडील किंवा पती हयात नाहीत. अशा परिस्थितीत प्रणालीमध्ये त्यांच्यासाठी कोणताही पर्याय उपलब्ध नाही.
त्यामुळे या महिलांची केवायसी प्रक्रिया थांबली असून, पुढील हप्ता रोखला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यभरातील अनेक महिलांनी या बाबत शासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
आता अशा महिला लाभार्थ्यांसाठी फडणवीस सरकार कोणता निर्णय घेते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
🔹 महाराष्ट्र वाणी — महिलांच्या हक्काचा आवाज!