‘लाडकी बहीण’ योजनेच्या जाहिरातीतही भ्रष्टाचार? – रोहित पवारांचा सरकारवर थेट आरोप

महाराष्ट्र वाणी न्युज
मुंबई दि २८ जुलै :– राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेच्या जाहिरात खर्चावरून सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, “हे सरकार #दलालीच्या_दलदलीत इतकं पोखरलं गेलंय की ‘लाडकी बहीण’ योजनेसुद्धा भ्रष्टाचारातून सुटलेली नाही.”
रोहित पवारांनी माहिती दिली की, १५ ऑगस्ट २०२४ रोजी राज्य सरकारने ‘लाडकी बहीण’ योजनेच्या जाहिरातींसाठी तब्बल २०० कोटी रुपयांचा खर्च दर्शवणारा शासन निर्णय (जीआर) काढला होता. या योजनेतील प्रचारासाठी २३ नोव्हेंबर २०२३ रोजी निवडलेल्या विशिष्ट संस्थांना काम देण्याची अपेक्षा होती. मात्र, ५ फेब्रुवारी २०२५ रोजी महिला व बालविकास विभागाने नवीन जीआर काढून फक्त ३ कोटी रुपयांच्या जाहिरात कामांना मान्यता दिली, ती सुद्धा २०० कोटींच्या आधीच्या मर्यादेतीलच असल्याचं नमूद केलं.
पण खळबळजनक बाब म्हणजे, आधी निश्चित केलेल्या संस्थांना काम न देता ही कामे इतर संस्थांना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. रोहित पवारांनी प्रश्न उपस्थित केला की, माहिती व जनसंपर्क विभाग असताना महिला व बालविकास विभागाने ही कामे का दिली? तसेच, ज्या कंपन्यांना जाहिरात कामं मिळाली, त्या कंपन्या कोणत्या, त्यांचा संबंध कोणाशी आहे, आणि माहिती अधिकारात माहिती मागूनही ती लपवण्यामागे काय कारण आहे? अशी विचारणा त्यांनी केली.
पवार म्हणाले, “बोगस कंपन्यांना जाहिरातीचं काम देण्यात आलं का? हे सरकार स्पष्ट करावं.” त्यांनी हे देखील नमूद केलं की “आम्ही पुराव्याशिवाय आरोप करत नाहीत.”
‘लाडकी बहीण’ योजनेच्या जाहिरातीतच शंका – आता सरकार काय खुलासा करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष!