रात्रीचा थरार! स्कुटीवर जाणाऱ्या दांपत्यावर चाकूचा धाक… लुटारूंना LCB ने ठोकलं बेड्या!
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १३ :- रात्रीच्या वेळी स्कुटीवरून जाणाऱ्या वृद्ध दांपत्याला चाकूचा धाक दाखवत सोन्याचे दागिने लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून मोठी कामगिरी बजावली आहे.
दि. २६ जानेवारी २०२६ रोजी फिर्यादी राजेश हिरालाल परदेशी (वय ५६), रा. गारखेडा यांनी पोलीस ठाणे पाचोड येथे तक्रार दिली होती. फिर्यादी व त्यांची पत्नी हे रात्री १८.४५ वाजता दाभरुळ शिवारातील रोहीलागड फाट्याकडून छत्रपती संभाजीनगरकडे स्कुटीवर जात असताना तोंडाला रुमाल बांधलेल्या चार अज्ञात आरोपींनी त्यांचा पाठलाग केला.
आरोपींनी चाकूचा धाक दाखवत दांपत्याकडील सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून पळ काढला. या प्रकरणी पोलीस ठाणे पाचोड येथे गु.र.नं. २९/२०२६ कलम ३०९(४), ३(५) भा.न्या.स प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गोपनीय माहितीवरून आरोपी निष्पन्न
पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपुत यांनी आरोपी निष्पन्न करण्यासाठी विशेष पथक तयार करून तपासाच्या सूचना दिल्या. तपासादरम्यान गोपनीय माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा अनिल माळवे व शाम पवार यांनी साथीदारांसह केला आहे.
दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी संशयितांचा शोध घेत असताना छत्रपती संभाजीनगर येथे दोघे आरोपी मिळून आले —
अनिल अंबादास माळवे (वय ५३), रा. चौधरी कॉलनी, छ. संभाजीनगर
शाम उत्तम पवार, रा. वडीगोद्री, ता. अंबड, जि. जालना
विश्वासाने चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देत दि. २४ जानेवारी २०२६ रोजी रोहीलागड फाटा ते निहालसिंग वाडी रोडदरम्यान वृद्ध दांपत्याकडील सोने हिसकावल्याचे मान्य केले.
सराईत गुन्हेगारांचा गुन्हेगारी इतिहास
अटक करण्यात आलेला आरोपी शाम उत्तम पवार हा बीड जिल्ह्यातील मोक्का गुन्ह्यात शिक्षा भोगून नुकताच कारागृहातून बाहेर आला आहे. तसेच आरोपी अनिल अंबादास माळवे याच्यावर एनडीपीएस अंतर्गत अनेक गुन्हे दाखल असून तो छत्रपती संभाजीनगर शहरातील मोक्का प्रकरणात अनेक दिवसांपासून फरार होता.
पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार मे. राठोड, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
या कामगिरीत पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपुत, स.पो.नि. पवन इंगळे, तसेच पोलीस अंमलदार विष्णु गायकवाड, शिवानंद बनगे, अशोक वाघ, अनिल काळे, महेश बिरुटे, सनी खरात, योगेश तरमळे, जीवन घोलप यांचा सहभाग होता.