राजकारणातील अनपेक्षित वळण! काँग्रेसचे एम.के. देशमुख भाजपात; मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून उमेदवारीची चर्चा
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर दि २९ :- शहराच्या पूर्व विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या तिकिटावरून उमेदवारीची चर्चा रंगवून भाजपा उमेदवार अतुल सावे यांना चांगलीच घाम फोडणारे माजी शिक्षण अधिकारी एम.के. देशमुख यांनी अखेर भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे. बुधवारी (दि. 29 ऑक्टोबर) मुंबईतील नरिमन पॉईंट येथील भाजपा प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी औपचारिक प्रवेश केला. यावेळी मंत्री अतुल सावे, आमदार अनुराधा चव्हाण, आमदार संजय काणेकर, अनिल मकरीये आदी उपस्थित होते.
एम.के. देशमुख हे जालना जिल्हा परिषदेत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागात अधिकारी म्हणून कार्यरत होते. 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काँग्रेस प्रवेश केला होता. त्यावेळी पूर्व मतदारसंघातून त्यांना काँग्रेसकडून उमेदवारीही जाहीर करण्यात आली होती. देशमुख यांच्या उमेदवारीमुळे भाजपात चांगलीच चिंता निर्माण झाली होती. मात्र अर्ज दाखल करण्याच्या आदल्या दिवशी काँग्रेसने अचानक उमेदवार बदलून लहू शेवाळे यांना उमेदवारी दिली. या बदलामुळे निवडणुकीची समीकरणे बदलली आणि भाजपा उमेदवार अतुल सावे यांना काठावर विजय मिळाला.
यानंतर देशमुख यांनी मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी जोरदार तयारी सुरू केली होती. त्यांच्या प्रवेशामुळे भाजपाला या मतदारसंघात मजबूत उमेदवार मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
"उमेदवारीसाठी प्रवेश नाही" — एम.के. देशमुख
भाजपात प्रवेश घेताना बोलताना एम.के. देशमुख म्हणाले,
"पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी मिळण्यासाठी मी भाजपात आलो आहे, अशी चर्चा सुरू आहे; परंतु यात कुठलेही तथ्य नाही. पक्ष जे काम देईल ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडेन. राजकारणात सेवा आणि कार्याची संधी मिळत असेल तर तो आनंदच आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, भाजपाचे आमदार संजय काणेकर यांनीही पुढील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत विजयाचे लक्ष्य ठेवल्याचे सांगितले आहे.
देशमुख यांच्या प्रवेशामुळे मराठवाड्यातील राजकारणाची समीकरणे बदलणार का? सगळ्यांच्या नजरा भाजपाच्या पुढील चालीकडे...!