या दिवशी लागू होणार आचारसंहिता? पहिल्या टप्प्यात नगरपालिकांच्या निवडणुका; मंगळवार किंवा बुधवारी आयोगाची पत्रकार परिषद!
महाराष्ट्र वाणी न्युज
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता काहीच दिवसांवर आल्या आहेत. नगरपालिकांच्या प्रभाग व नगराध्यक्षांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर मतदार यादीही अंतिम करण्यात आली आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात राज्यातील २८९ नगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद मंगळवारी सायंकाळी किंवा बुधवारी दुपारी होणार आहे. त्याच दिवशी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यात एकूण २८९ नगरपालिका, ३२ जिल्हा परिषदा, ३३१ पंचायत समित्या आणि २९ महापालिका या संस्थांच्या निवडणुका पार पाडायच्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पूर्वी पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून, महापालिकांच्या प्रभाग व महापौर आरक्षणाची घोषणा या महिन्यात अपेक्षित आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आगामी तीन टप्प्यातील निवडणुका सुमारे ८५ दिवसांच्या कालावधीत पार पडतील. पहिल्या टप्प्यात नगरपालिका निवडणुका, दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदा व पंचायत समित्या आणि तिसऱ्या टप्प्यात महापालिकांच्या निवडणुका घेण्याचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे.
राज्यातील तब्बल ९ कोटींहून अधिक मतदार या निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
संभाव्य निवडणूक टप्पे असे :
🔹 पहिला टप्पा – २८९ नगरपालिका : सुमारे २१ दिवसांचा कार्यक्रम
🔹 दुसरा टप्पा – ३२ जिल्हा परिषदा व ३३१ पंचायत समित्या : ३० ते ३५ दिवसांचा कार्यक्रम
🔹 तिसरा टप्पा – २९ महापालिका : २५ ते ३० दिवसांचा कार्यक्रम
अशा प्रकारे तिन्ही टप्प्यातील निवडणुका पूर्ण होईपर्यंत सुमारे तीन महिने सलग आचारसंहिता लागू राहण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या डेडलाईनमुळे निवडणूक आयोगाला पुढील तीन महिन्यांत मोठे नियोजन राबवावे लागणार आहे.
🗳️ जनतेचे लक्ष आता बुधवारी होणाऱ्या आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे लागले आहे!