"मार्टि" कृती समितीकडून अल्पसंख्याक आयुक्त प्रतिभा इंगळे यांचा सत्कार
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी तातडीच्या योजना राबविण्याची मागणी
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद) दि ३० जुलै :– महाराष्ट्र राज्याच्या नव्या अल्पसंख्याक आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मा. प्रतिभा इंगळे यांचा "मार्टि" कृती समिती महाराष्ट्रच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी समितीने अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था (मार्टि) संदर्भात सविस्तर चर्चा करत शासनाकडे काही महत्त्वपूर्ण मागण्या सादर केल्या.
या चर्चेत "मार्टि" संस्था अद्याप प्रारंभिक टप्प्यात असतानाही अल्पसंख्याक विद्यार्थ्यांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी महाज्योती व अमृत या संस्थांच्या माध्यमातून योजनांची तात्पुरती अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी समितीने लेखी स्वरूपात सादर केली. या योजनांत शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, कौशल्यविकास प्रशिक्षण, तसेच परदेश शिक्षणासाठी सहाय्य योजना यांचा समावेश आहे.
या कार्यक्रमात समितीचे अध्यक्ष अॅड. अझर पठाण, उपाध्यक्ष सर आसिफ, फिरदोस फातेमा, सतीश वानखेडे, रामजानी खान, जाहेद अल्कासेरी, इम्रान बाश्वान, लईक अहमद, अब्दुल राफे, अझहर खान, वासिम अहमद, अश्फाक अहमद यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.
मा. आयुक्त प्रतिभा इंगळे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सांगितले की, "विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने ही मागणी योग्य असून संबंधित विभागांशी पाठपुरावा करून लवकरच तात्पुरत्या योजनांची अंमलबजावणी सुनिश्चित केली जाईल. पदभरती आणि इतर प्रक्रिया लवकरच पूर्ण होतील, यासाठीही प्रयत्न सुरू आहेत."
दि. २२ ऑगस्ट २०२४ रोजी राज्य शासनाने "अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था (मार्टि)" स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. सध्या या संस्थेच्या रचना, MOA, पदभरती, लेखाशिर्ष प्रस्ताव व सल्लागार नियुक्तीच्या प्रक्रियांची अंमलबजावणी सुरू आहे. या दरम्यान, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिक्षण व प्रशिक्षणाच्या संधी गमवाव्या लागू नयेत, यासाठी समितीने शासनाकडे तत्काळ कृतीची मागणी केली.
अशीच बातमी पाहण्यासाठी वाचत राहा [महाराष्ट्र वाणी].