इयत्ता 12 वी इंग्रजी पेपरदरम्यान गैरप्रकार प्रकरणी 24 जणांविरुद्ध गुन्हा नोंद
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ११ :- जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालय, जैतापूर येथील इयत्ता 12 वीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरदरम्यान गैरप्रकार आढळून आल्याने 24 जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 1.20 वाजता इयत्ता बारावीच्या इंग्रजी विषयाच्या पेपर सुरु असताना श्रीमती अश्विनी लाठकर शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांच्या भरारी पथकाने संबंधित परीक्षा केंद्रास अचानक भेट दिली. या केंद्रावर इंग्रजी विषयाच्या परीक्षेसाठी 331 विद्यार्थी प्रविष्ट होते, त्यापैकी 327 विद्यार्थी उपस्थित होते. परीक्षा 14 वर्गखोल्यांमध्ये आयोजित करण्यात आली होती.
परीक्षा केंद्र पाहणी दरम्यान काही विद्यार्थ्यांकडे मोबाईलवर सोडवलेली उत्तरे तसेच हस्तलिखित स्वरूपातील 9 झेरॉक्स प्रती आढळून आल्या. केंद्रावर कार्यान्वित असलेल्या CCTV कॅमेऱ्यांच्या फुटेजची तपासणी करण्यात आली असता काही वर्गखोल्यांमध्ये नियुक्त पर्यवेक्षक विद्यार्थ्यांना कॉपी करण्यास मदत करत असल्याचे स्पष्ट दिसून आले. तसेच काही विद्यार्थ्यांनी एकमेकांच्या उत्तरपत्रिकांकडे पाहून नक्कल केल्याचेही निदर्शनास आले. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली असून परीक्षा केंद्र संचालकासह एकूण 24 जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जिल्हा परिषद आस्थापनेवरील पर्यवेक्षक शिक्षक व बैठे पथकातील सदस्यांविरुद्ध निलंबनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्याबाबतचा प्रस्ताव संबंधित प्राधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे.
जिल्हा परिषद कर्मचारी नसलेल्या संबंधित खाजगी संस्थांच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध त्यांच्या संस्थामार्फत शिस्तभंगाची कार्यवाही तसेच नियमांनुसार निलंबनाची कायदेशीर प्रक्रिया राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हा दक्षता समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर श्री अंकित तसेच महाराष्ट्र राज्य मंडळ, पुणे चे अध्यक्ष श्री नंदकुमार बेडसे विभागीय शिक्षण मंडळ छत्रपती संभाजीनगर श्री.अनिल साबळे यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे.
गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती कन्नड यांना संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याबाबत प्राधिकृत करण्यात आले होते. त्यानुसार देवगाव रंगारी पोलिस स्टेशन, ता. कन्नड येथे परीक्षा केंद्रावर नियुक्त 24 कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात राष्ट्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जैतापूर येथील 13 कर्मचारी, राष्ट्रीय प्राथमिक विद्यालय, हतनूर येथील 5 कर्मचारी, न्यू हायस्कूल देभेगाव येथील 2 कर्मचारी तसेच जिल्हा परिषद आस्थापनेवरील 4 कर्मचारी यांचा समावेश आहे. यापैकी जिल्हा परिषद आस्थापनेवरील कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आले असून संस्थेतील कार्यरत कर्मचाऱ्याना संस्था प्राधिकृत अधिकारी असल्याने सदर संस्थेस निलंबन करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. सदर केंद्रावरील 327 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका विभागीय परीक्षा मंडळाकडे स्वतंत्रपणे सादर करण्याबाबत परिरक्षक कार्यालयास सूचना देण्यात आल्या आहेत.
यापुढे प्रत्येक परीक्षा केंद्रावर CCTV यंत्रणा असणे बंधनकारक राहील तसेच परीक्षा कालावधीत सर्व कॅमेरे सुरू अवस्थेत ठेवणे आवश्यक राहील, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. राज्य व जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व केंद्रसंचालकांना कडक सूचना देण्यात आल्या असून कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे जिल्हाभरात सर्व परीक्षा केंद्रांनी कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा संचालन करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. इयत्ता बारावीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचे अधिक लक्ष राहणार असून परीक्षा पारदर्शक, शिस्तबद्ध आणि निःपक्षपाती वातावरणात पार पडावी यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत.