विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये “बुक बँक” उपक्रम, स्पर्धा परीक्षांचे बाळकडू देणार
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. १४ :- जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या “दशसूत्री” उपक्रमांतर्गत वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी बुक बँक संकल्पना राबविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतला असून त्याची अंमल बजावणी करण्याचे आदेश शिक्षण विभागाला देण्यात आले आहेत.
यासंदर्भात आज दूरदृष्य प्रणाली द्वारे बैठक आयोजित करून जिल्हाधिकारी स्वामी यांनी शिक्षण विभागाला निर्देश दिले.
शिक्षणाधिकारी (माध्य)अश्विनी लाठकर, शिक्षणाधिकारी (प्राथ) जयश्री चव्हाण, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषयतज्ञ असे एकूण १६२ जण या बैठकीस उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करणे, अवांतर वाचनाद्वारे अभ्यासक्रमाबाहेरील ज्ञान वाढविणे तसेच गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तके उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेत लहान ग्रंथालय उभारून विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असे जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले.
*उपक्रमाची उद्दिष्टे*
मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करून “वाचाल तर वाचाल” या संकल्पनेला बळकटी देणे.
गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षांसाठी पुस्तके उपलब्ध करून देणे.
विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांमध्येही वाचन संस्कृती वाढविणे.
*अशी होईल अंमलबजावणी*
प्रत्येक शाळेत स्वतंत्र पुस्तक कपाट किंवा रॅकची व्यवस्था करून विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार पुस्तके ठेवली जाणार आहेत. अभ्यासक्रमाबाहेरील ज्ञानवर्धक, संस्कारवर्धक, आरोग्यविषयक व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त साहित्याची यादी तयार केली जाईल. जिल्हा परिषद शिक्षण विभाग, शासकीय ग्रंथालये, मराठी भाषा विभाग तसेच विविध संस्थांकडून पुस्तके उपलब्ध करून घेण्यात येतील.
स्थानिक शिक्षण समित्या, माजी विद्यार्थी, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था (NGO), तसेच लायन्स क्लब व रोटरी क्लब यांच्या सहकार्याने पुस्तक संकलन मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्हा स्तरावर CSR निधीतूनही पुस्तके उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करण्यात येतील.
*मुख्याध्यापक करतील व्यवस्थापन*
बुक बँकेचे व्यवस्थापन मुख्याध्यापकांच्या देखरेखीखाली राहील. शिक्षक विद्यार्थ्यांना पुस्तक वापर मार्गदर्शन करतील. तालुका व जिल्हा स्तरावर शिक्षणाधिकारी उपक्रमाची अंमलबजावणी व तपासणी करतील.
*अंमलबजावणीची कार्यपद्धती*
विद्यार्थ्यांना पुस्तके ठरावीक कालावधीसाठी देण्यात येतील व परत घेतली जातील. परत आलेली पुस्तके नीट नेटके व स्वच्छ करून पुढील वर्षासाठी वापरात ठेवली जातील. पुस्तक नोंदणीसाठी स्वतंत्र नोंदवही ठेवण्यात येईल. विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकांवर चर्चा, सादरीकरण, वाचन उपक्रम व परिपाठातून अनुभव मांडण्यास प्रोत्साहन दिले जाईल.
CSR माध्यमातून उपलब्ध शिष्यवृत्ती परीक्षांसाठीच्या पुस्तकांचे वितरण १० फेब्रुवारी रोजी करून या उपक्रमाची सुरुवात झाली आहे,असेही जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले.
*पुस्तके दान करण्याचे आवाहन*
या उपक्रमाला चालना देण्यासाठी समाजातील व्यक्ती, संस्था आपले योगदान देऊ शकतात. आपल्याकडील पुस्तके(विद्यार्थ्यांना उपयोगी ठरतील असे) आपण दान करू शकता. त्यासाठीसंबंधित गट शिक्षणाधिकारी, तहसीलदार यांना संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले आहे.