माथाडी कामगारांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने!कायद्याचे काटेकोर अंमलबजावणी व अन्य मागण्यांसाठी आंदोलन
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि. १८ :- माथाडी कायद्यातील मालकधार्जिणे बदल रद्द करावेत आणि कायद्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, या मागण्यांसाठी आज माथाडी कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने केली.
महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे विभागीय आयुक्त कार्यालयावर सुरू असलेल्या धरणे सत्याग्रहाला पाठिंबा दर्शवण्यात आला. यावेळी कामगारांनी सादर केलेल्या निवेदनात पुढील महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या –
काढून टाकलेल्या कामगारांना तात्काळ पूर्ववत कामावर घ्या
माथाडी मंडळातील नोकरभरतीत हमाल-मापाड्यांच्या पाल्यांना प्राधान्य द्या
१२ तासांचा कामाचा निर्णय रद्द करा; कष्टकऱ्यांना गुलामगिरीत ढकलणारा निर्णय
सुटीच्या दिवशी केलेल्या कामाचे दुप्पट वेतन द्या
शासकीय धान्य गोदाम व इतर ठिकाणच्या कामगारांची थकबाकी तात्काळ वसुली करा
राज्यातील लेव्ही किमान ४०% पर्यंत वाढवा
सर्व कष्टकऱ्यांना म्हातारपणासाठी पेन्शन लागू करून प्रतिमहा किमान ५ हजार रुपये द्या
राहण्यासाठी हक्काचे घर उपलब्ध करून द्या
हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
या आंदोलनात महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस साथी सुभाष लोमटे, मराठवाडा लेबर युनियनचे उपाध्यक्ष साथी छगन गवळी, बाजार समिती संचालक साथी देविदास किर्तीशाही, साथी प्रवीण सरकटे, साथी फारुख भाई, साथी भारत गायकवाड यांच्यासह इतर कामगार सहभागी झाले होते.
यावेळी ज्येष्ठ प्राध्यापक एच. एम. देसरडा व दलित पँथर्सचे रमेश भाई खंडागळे यांनी मार्गदर्शन केले. कायद्याच्या चौकटीतील प्रश्न तात्काळ मार्गी लावले नाहीत, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला.
“कष्टकऱ्यांच्या हक्काच्या लढ्याला आता धार येत असून, सरकारने ठोस भूमिका घेतली नाही तर आंदोलन अधिक उग्र होणार, हे निश्चित दिसतेय.”