महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुले पत्र – शेतकऱ्यांना एकरी ३० ते ४० हजार मदत द्या!
✒️ महाराष्ट्र वाणी
मुंबई दि २४ :- महाराष्ट्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली असून, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुले पत्र लिहून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
राज ठाकरे यांनी पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे की –
कुठल्याही निकषांच्या चौकटीत न अडकता सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा.
विद्यमान ७-८ हजार रुपयांच्या तुटपुंज्या नुकसान भरपाईऐवजी एकरी किमान ३० ते ४० हजारांची मदत जाहीर करावी.
केंद्राकडे पाठपुरावा करून मदत पॅकेज मिळवावे, जसं बिहारला मिळालं तसं महाराष्ट्रालाही मिळालं पाहिजे.
विद्यार्थ्यांचं शिक्षण खंडित होऊ नये यासाठी शासनाने वह्या-पुस्तकं व आवश्यक सुविधा द्याव्यात.
आपत्ती नंतर होणाऱ्या रोगराईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज ठेवावा.
बँकांचा कर्जहप्ता वसुलीचा तगादा थांबवण्यासाठी शासनाने बँकांना स्पष्ट आदेश द्यावेत.
“शेतकऱ्यांचे अश्रू पुसणे हे सरकारचं कर्तव्य आहे; पण त्याची जाहिरातबाजी करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. त्यामुळे तात्काळ ठोस निर्णय घेऊन शेतकऱ्यांना उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे,” असेही ठाकरे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
👉 शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मनसेची ठाम भूमिका – आता सरकारच्या निर्णयाकडे राज्यभराचे लक्ष!