महापालिकेतही भरतीची गती! 31 वारसांना नियुक्तीपत्र वितरण

महापालिकेतही भरतीची गती! 31 वारसांना नियुक्तीपत्र वितरण
महापालिकेतही भरतीची गती! 31 वारसांना नियुक्तीपत्र वितरण

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.२४ :- 

महापालिकेचे काम थेट जनतेशी जोडलेले असल्यामुळे नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे आणि मन लावून काम करावे, असे आवाहन महापौर समीर राजूरकर यांनी केले.

महानगरपालिकेतील सेवानिवृत्त तसेच दिवंगत सफाई कामगारांच्या वारसांना शासन निर्णय व लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार वारसाहक्क पद्धतीने नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी एकूण 31 वारसांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

या कार्यक्रमाला स्थायी समिती सभापती अनिल मकरीये, विरोधी पक्ष नेता समीर साजीद, महिला व बालकल्याण समिती सभापती शोभा बुरांडे, शहर सुधार समिती सभापती जालिंदर शेंडगे, नगरसेवक नंदू गवळी, अशोक हिवराळे, रवी कावळे यांच्यासह महापालिका आयुक्त जी. श्रीकांत, अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, उपायुक्त अभय प्रामाणिक आणि अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

महापौर राजूरकर म्हणाले की, प्रत्येक कर्मचाऱ्याने आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडाव्यात. विशेष म्हणजे, दोन महिन्यांपूर्वी बॅनर काढताना विजेचा धक्का लागून मृत्यू झालेल्या अमोल जाधव यांच्या पत्नीचाही या नियुक्तीत समावेश करण्यात आल्याने त्यांनी प्रशासनाचे कौतुक केले.

यावेळी आयुक्त जी. श्रीकांत यांनी सांगितले की, या नियुक्त्या विक्रमी कालावधीत पूर्ण करण्यात आल्या असून सफाई कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. यामध्ये एक कोटी रुपयांचा विमा, वारसांना त्यांच्या शिक्षणानुसार नोकरीची संधी, तसेच दर दुसऱ्या व तिसऱ्या शुक्रवारी ‘कर्मचारी समाधान शिबिर’ आयोजित करून त्यांच्या समस्या सोडवल्या जातात.

तसेच, लाड-पागे समितीच्या प्रक्रियेसाठी मार्गदर्शन आणि सफाई कामगारांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी प्रशासनाने वेल्फेअर ऑफिसरचीही नियुक्ती केली आहे.

 नोकरीसोबत जबाबदारीही मोठी… आता शहराच्या सेवेत ही नवी पिढी किती प्रामाणिकपणे उतरते, याकडे सर्वांचे लक्ष!