"महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक निर्भीड, पारदर्शक व शांततेत पार पाडणे ही सर्व अधिकाऱ्यांची सामूहिक जबाबदारी - आयुक्त जी. श्रीकांत"
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.१८ :-
आगामी 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूकपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी आज स्मार्ट सिटी कार्यालयात महानगरपालिका प्रशासन, पोलीस आयुक्तालय व निवडणूक निर्णय अधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उप आयुक्त पंकज अतुलकर, मनपा अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, कल्पिता पिंपळे, सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी (ARO) तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
निवडणूक तयारीवर सखोल आढावा
बैठकीदरम्यान निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यामध्ये मतदान केंद्रांची संख्या व ठिकाणे, मतमोजणी केंद्रांची व्यवस्था, आचारसंहितेच्या उल्लंघनासंदर्भातील तक्रार निवारण यंत्रणा, मतदान दिवशीचा सुरक्षा बंदोबस्त तसेच मतदारांसाठी आवश्यक सोयी-सुविधा याबाबत सखोल चर्चा करण्यात आली.
मतदारांसाठी सुविधा सुनिश्चित करण्याचे निर्देश
आयुक्त जी. श्रीकांत यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देताना सांगितले की, प्रत्येक मतदान केंद्रावर पिण्याचे स्वच्छ पाणी, पंखे, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅम्प, आवश्यकतेनुसार मंडप, स्वच्छतागृह व प्रकाशव्यवस्था या मूलभूत सुविधा उपलब्ध असाव्यात.
ज्या मतदान केंद्रांवर या सुविधांमध्ये काही त्रुटी आढळून येतील, त्या त्वरित दूर करून मतदानाच्या आधी सर्व व्यवस्था पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे त्यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले की,
“महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक ही निर्भीड, पारदर्शक, शांततेत व कोणताही भेदभाव न करता पार पाडणे ही सर्व संबंधित अधिकाऱ्यांची सामूहिक जबाबदारी आहे. कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता कायद्याच्या चौकटीत काम केले जावे.”
पोलीस विभागाच्या सूचनांवर भर
पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी सांगितले की, मतदान केंद्रांची अंतिम यादी निश्चित होताच ती पोलीस विभागाला उपलब्ध करून देण्यात यावी, जेणेकरून त्या अनुषंगाने योग्य व चोख सुरक्षा बंदोबस्ताचे नियोजन करता येईल.
ते पुढे म्हणाले की, मतदान प्रक्रियेची गोपनीयता व शिस्त राखण्यासाठी मतदारांना मतदान केंद्रात मोबाईल फोन नेण्यास सक्त मनाई असेल. यासाठी मतदान केंद्रापासून शंभर मीटरच्या अंतरावर मोबाईल जमा करण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी.
तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरावर भर
निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक व विश्वासार्ह करण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे, वेबकास्टिंग व्यवस्था तसेच अन्य आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याचे स्पष्ट निर्देश बैठकीत देण्यात आले.