महानगरपालिका ‘घरची ओसरी’ नाही! दादागिरी खपवून घेतली जाणार नाही – आयुक्त श्रीकांतांचा नगरसेवकांना थेट इशारा

महानगरपालिका ‘घरची ओसरी’ नाही! दादागिरी खपवून घेतली जाणार नाही – आयुक्त श्रीकांतांचा नगरसेवकांना थेट इशारा

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १७ :- महानगरपालिका तब्बल सहा वर्षे लोकप्रतिनिधीविना प्रशासकीय नियंत्रणाखाली सुरळीत चालली. या काळात कोणतेही राजकीय हस्तक्षेप, दबाव किंवा नातेवाईकांची वर्दळ न होता आयुक्तांच्या नेतृत्वाखाली नियमबद्ध कारभार सुरू होता. फाईल प्रक्रिया, शिस्त आणि कायदा हेच प्रशासनाचे सूत्र होते.

मात्र १५ जानेवारी रोजी निवडणूक पार पडून १६ जानेवारीला निकाल लागल्यानंतर महानगरपालिकेतील वातावरण बदलू लागले. काही नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांसह त्यांच्या नातेवाईकांनी थेट अधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन आरडाओरडा, दमदाटी, शिवीगाळ करण्याचे प्रकार सुरू केल्याचे समोर आले आहे.

महानगरपालिकेची कार्यपद्धती, विभागप्रमुखांची जबाबदारी आणि नियमांची चौकट याचा अनुभव नसतानाही काहींच्या वर्तनामुळे प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याची बाब आयुक्तांच्या आढावा बैठकीत पुढे आली.

या पार्श्वभूमीवर आयुक्त जी. श्रीकांत यांनी कठोर भूमिका घेत स्पष्ट इशारा दिला आहे की, महानगरपालिकेत गैरवर्तन, शिवीगाळ किंवा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास थेट फौजदारी कारवाई केली जाईल.

लोकशाहीत निवडून येणे म्हणजे कायद्यापेक्षा मोठे होणे नाही. अधिकार सेवा करण्यासाठी असतो, दादागिरी करण्यासाठी नाही, असा ठाम संदेश आयुक्तांनी दिला.

शहरातील नागरिकांना अपेक्षा होती की लोकप्रतिनिधी आल्यावर विकासकामांना गती मिळेल. मात्र जर सुरुवातच दबाव, गैरशिस्त आणि हस्तक्षेपाने होत असेल, तर तो जनादेशाचा अपमान ठरेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

महानगरपालिका ही जनतेच्या सेवेसाठी असलेली संस्था आहे, कोणाच्याही खाजगी मालकीची जागा नाही. नियम समजून घेत, प्रक्रियेतून काम करून जनतेचा विश्वास जपणे हीच खरी लोकप्रतिनिधींची जबाबदारी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

शहराला विकासाची गरज आहे, दादागिरीची नाही – लोकशाहीचा पहिला धडा हा शिस्तीचाच असतो!