महसूल विभागाचा अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्याकडून कामकाजाचा आढावा

महसूल विभागाचा अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्याकडून कामकाजाचा आढावा
महसूल विभागाचा अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्याकडून कामकाजाचा आढावा

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. २० :– राज्याचे महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्ह्यातील महसूल विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.

या आढावा बैठकीस विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे, निवासी उपजिल्हाधिकारी जर्नाधन विधाते, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) एकनाथ बंगाळे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) सुचित्रा शिंदे, उपजिल्हाधिकारी (रोजगार हमी योजना) रुपेश शिंगारे, उपविभागीय अधिकारी पैठण-फुलंब्री निलम बाफना, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, खनिकर्म अधिकारी दिनेश झांपले, तहसीलदार छत्रपती संभाजीनगर शिवानंद बिडवे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सेतू सुविधा केंद्र येथे प्रत्यक्ष पाहणी दरम्यान सामान्य नागरिकांना शासनाने निर्धारित केलेल्या माफक दरात व वेळेत सेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच ‘आपले सरकार’ पोर्टलद्वारे नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन वेळेत मिळावे, असे निर्देश श्री. खारगे यांनी दिले.

गायरान व शासन मालकीच्या जमिनीवरील अतिक्रमणे त्वरीत कमी करण्यासाठी महसूल विभाग, जिल्हा परिषद, महावितरण व संबंधित विभागांनी समन्वयाने बैठक घेऊन प्रभावी कार्यवाही करावी, अशा सूचना देण्यात आल्या. तसेच गौण खनिज व रेतीचे अवैध उत्खनन रोखण्यासाठी कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

भूसंपादन प्रक्रियेत सामान्य नागरिकांना योग्य मोबदला व लाभ मिळावा, घरकुल योजना, पाझर तलाव, पाणंद रस्ते, वर्ग-2 जमीन वर्ग-1 करणे तसेच राज्यातील महत्त्वाकांक्षी रस्ते व रेल्वे प्रकल्पांकरिता आवश्यक जमीन अधिग्रहण प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, असेही निर्देश देण्यात आले.

महसूल विभागाने शंभर टक्के ई-शासन प्रणालीचा अवलंब करावा, जिल्हाधिकारी ते गावपातळीवरील कोतवालांपर्यंत समन्वय ठेवून कामाचे प्रभावी नियोजन करावे व मार्च अखेरीस महसुली वसुली पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे बैठकीदरम्यान सुचविण्यात आले.