मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले; आंदोलकांसाठी १० कडक सूचना

मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले; आंदोलकांसाठी १० कडक सूचना
मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले; आंदोलकांसाठी १० कडक सूचना

महाराष्ट्र वाणी न्युज 

मुंबई दि २९ :- मराठा आरक्षणासाठी गेल्या काही महिन्यांपासून राज्यभर ठाम लढा देणारे मनोज जरांगे पाटील अखेर मुंबईत दाखल झाले. आज (२९ ऑगस्ट) सकाळी १० वाजल्यापासून त्यांनी आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केले. या वेळी त्यांनी सरकारला थेट आव्हान दिले – “माझ्यावर गोळ्या झाडल्या तरी चालतील, पण आरक्षण मिळाल्याशिवाय मी माघार घेणार नाही.”

आंदोलकांना शांततेचे आवाहन

मुंबईच्या आझाद मैदानात दाखल झाल्यानंतर जरांगे पाटील यांनी उपस्थित हजारो आंदोलनकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले. “मुंबईकरांना त्रास होणार नाही, ही जबाबदारी आपलीच आहे. आंदोलन शिस्तबद्ध झाले पाहिजे. सरकारने आपल्याला मैदान उपलब्ध करून दिले आहे, त्यामुळे आता संयमाने लढा देण्याची वेळ आली आहे,” असे ते म्हणाले.

त्यांनी सांगितले की, आंदोलनाचा उद्देश फक्त आरक्षण आहे, त्यापलीकडे कोणत्याही गोष्टीत गुंतायचे नाही. “आपलं लक्ष्य फक्त आरक्षण, इतर कोणतीही भटकंती नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

जरांगे पाटलांच्या १० महत्त्वाच्या सूचना :

1. कोणत्याही प्रकारची गोंधळ घालायचा नाही.

2. दगडफेक, जाळपोळ किंवा हिंसाचार होऊ नये.

3. मुंबई दोन तासांत मोकळी करा – रस्ते वाहतुकीसाठी खुले ठेवा.

4. पोलिस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करा

5. सरकारने दिलेल्या मैदानातच मुक्काम करा, काहींनी वाशी येथे थांबावे.

6. वाहनं फक्त अधिकृत पार्किंगमध्येच उभी करा; हायवेवर गाड्या लावू नका.

7. मुंबईकरांना त्रास होणार नाही, याची खबरदारी घ्या.

8. जे सोडण्यासाठी आले आहेत त्यांनी परत गावाकडे जावे.

9. फक्त आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करा; इतर वाद टाळा.

10. आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडायची नाही.

आंदोलनाची पार्श्वभूमी

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सातत्याने उपोषण, मोर्चे आणि दौरे केले आहेत. याआधी अनेक ठिकाणी मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव रस्त्यावर उतरले. मात्र, मुंबईतील उपोषणाला ऐतिहासिक महत्त्व आहे. राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर हजारो आंदोलकांनी आझाद मैदान गाठले आहे.

सरकारसोबत आधी झालेल्या चर्चेचा उल्लेख करत जरांगे पाटील यांनी सांगितले – “सरकारने या वेळेस सहकार्य केले आहे, त्याचे आपण कौतुकही केले. पण आता अंतिम लढा मुंबईतूनच दिला जाणार आहे.”

आझाद मैदानात सुरू झालेल्या आमरण उपोषणामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. मराठा समाजाचा निर्धार स्पष्ट आहे – आरक्षण मिळेपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही.

👉 आंदोलन निर्णायक टप्प्यात – महाराष्ट्राची नजर आझाद मैदानावर खिळली आहे!