मनपा समोर रमाई घरकुल लाभार्थ्यांचा संताप — योजनाच्या अंमलबजावणीसाठी जोरदार निदर्शने
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर,(औरंगाबाद)दि १६ : – रमाई घरकुल योजनेच्या अंमलबजावणीत झालेल्या विलंब व लाभार्थ्यांची यादी रद्द केल्याच्या निषेधार्थ आज (16 ऑक्टोबर) दुपारी महापालिकेसमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. रमाई घरकुल संघर्ष कृती समिती, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.
महापालिकेच्या वतीने रमाई घरकुल योजना राबवली जात असली तरी, लाभार्थ्यांना अनुदान न मिळाल्याने तसेच 31 मे 2025 रोजी मंजूर झालेली यादी आयुक्त जी. श्रीकांत यांनी अध्यादेशाद्वारे रद्द केल्याने लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
आंदोलनकर्त्यांनी रमाई घरकुल लाभार्थ्यांची यादी पुन्हा कार्यान्वित करावी, प्रत्येक लाभार्थ्याला दरमहा अनुदान द्यावे, दिवाळीपूर्वी निधी वितरित करावा तसेच योजना निधी पाच लाख रुपयांपर्यंत वाढवावा, अशी प्रमुख मागणी केली.
यावेळी कार्यकर्त्यांनी आयुक्त जी. श्रीकांत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि परिसर घोषणांनी दणाणून गेला. आंदोलनानंतर शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. या मागण्या तत्काळ मान्य न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नेत्यांनी दिला.
या निदर्शनाचे नेतृत्व बीआरएसपीचे प्रदेश महासचिव अरविंद कांबळे, रमाई घरकुल कृती समितीचे मुख्य प्रवर्तक मधुकर ढेपे, जिल्हाध्यक्ष विजय शिनगारे, जिल्हा सचिव विष्णू वाघमारे, गब्बू कुरेशी, राहुल साबळे, अमोल पवार, अनामी मोरे यांनी केले. यावेळी सचिन महापुरे, सतीश भुजंग, भगवान पवार, कुणाल लांडगे, सलमान पठाण, खालिद शेख, मिलिंद राघवंश, राहुल साळवे, गणेश ठाकूर, सुधाकर भिसे, चंद्रकांत वाघमारे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
✍️ महाराष्ट्र वाणी – लोकशक्तीचा आवाज