मनपा निवडणूक : महायुती की महाविकास आघाडी? राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिजीत देशमुख यांचा मोठा इशारा

मनपा निवडणूक : महायुती की महाविकास आघाडी? राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिजीत देशमुख यांचा मोठा इशारा

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. १८ :

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात झाली असली तरी महायुती आणि महाविकास आघाडीबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नसल्याचे चित्र आहे.

भाजपा आणि शिंदे गटाची प्राथमिक बैठक नुकतीच पार पडली. मात्र या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसला निमंत्रण न दिल्यामुळे पक्षात नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिजीत देशमुख यांनी युतीबाबत भूमिका स्पष्ट केली.

देशमुख म्हणाले की, “महायुतीकडून सन्मानपूर्वक निमंत्रण मिळेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. जागावाटपावर सकारात्मक चर्चा झाली तर तोडगा निघू शकतो. अन्यथा वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून स्वबळावर निवडणूक लढण्याचा किंवा महाविकास आघाडीतील घटक पक्ष, वंचित तसेच समविचारी पक्षांसोबत जाण्याचा पर्याय खुला आहे.”

मनपा निवडणुकीसाठी 29 प्रभागांतून तब्बल 240 इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले असून त्यांची मुलाखत प्रक्रिया सुरू आहे. मुस्लिम बहुल प्रभागांमध्ये प्रत्येकी तीन ते चार बलाढ्य उमेदवार इच्छुक असल्याची माहितीही त्यांनी दिली. प्रत्येक प्रभागात स्वतंत्र बैठक घेतली जात असून विविध पक्षांतील काही नेते राष्ट्रवादीत प्रवेशासाठी इच्छुक असल्याचे संकेत आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे सर्व जाती-धर्मातील नागरिकांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असून, त्यामुळे अल्पसंख्याक समाजाचा मोठा पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळत असल्याचा दावा देशमुख यांनी केला.

आगामी महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार असून, सर्व जाती-धर्मातील कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल. प्रभागातील कामगिरी, जनसंपर्क आणि निवडून येण्याची क्षमता या निकषांवर उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मनपाच्या रणांगणात युतीचा पेच सुटणार की राजकारणाला नवी कलाटणी मिळणार? उत्तर लवकरच स्पष्ट होणार आहे.