“मतचोरीचा पहिला प्रयोग कामठीत”; मत चोर सरकारला सत्तेतून खाली खेचू - हर्षवर्धन सपकाळ
महाराष्ट्र वाणी न्युज
कामठी (नागपूर) दि ३ :- काँग्रेस पक्षाच्या राज्यव्यापी ‘वोट चोर, गद्दी छोड’ आंदोलनाचा पहिला भव्य मेळावा नागपूर जिल्ह्यातील कामठीत पार पडला. हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात भाजप सरकारवर “मतचोरी करून सत्तेत आल्याचा” आरोप करत काँग्रेसच्या नेत्यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, “महाराष्ट्रात मतचोरीचा पहिला प्रयोग कामठीत झाला. भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मतदारसंघातून या मतचोरीला सुरुवात झाली आणि आज महाराष्ट्रात १३२ आमदार निवडून येण्यामागे हाच डाव आहे. आता या मतचोरांना सत्तेतून खाली खेचल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.”
ते पुढे म्हणाले, “नागपूरमधून मोदींच्या पायाखालची वाळू सरकली आहे. देशात मध्यावधी निवडणुका होण्याची चिन्हे आहेत. लोकशाहीला हात लावाल तर काँग्रेस गप्प बसणार नाही. शिव, शाहु, फुले, आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे नवे सरकार लवकरच सत्तेत येईल.”
वडेट्टीवार यांचा भाजपवर हल्ला
विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप व संघावर तोफ डागताना म्हटले, “एका घरात ५६ मुले, १० बाय १० च्या खोलीत १०९ मतदार दाखवले गेले. अशा प्रकारे मतदार याद्यांत फेरफार करून भाजपाने सत्ता मिळवली. हे लोक भित्रे आहेत, चोरूनच सत्तेत आले आहेत. कामठीचा सरदार तर या मतचोरीत आघाडीवर होता. पण मतदार मात्र या मतचोरांना धडा शिकवणार आहेत.”
“मतांचा अधिकार धोक्यात” – सतेज पाटील
विधान परिषदेतील काँग्रेस गटनेते सतेज पाटील म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मतदानाचा अधिकार आज धोक्यात आला आहे. आपण टाकलेले मत खरंच आपल्या उमेदवारालाच जाते का यावर शंका निर्माण झाली आहे. राहुल गांधींनी या मतचोरीच्या मुद्द्यावर ७ ऑगस्टला पत्रकार परिषद घेतली आणि जगभर या प्रश्नाची दखल घेतली गेली. आता हा लढा प्रत्येकाने उचलून धरायला हवा.”
नसीम खानांचा आरोप
माजी मंत्री नसीम खान यांनी आरोप केला की, “लोकसभेत मविआने चांगले यश मिळवले होते. पण पाच महिन्यांत ४५ लाख मतदारांची वाढ करण्यात आली. मतदानाच्या काही दिवसांपूर्वी ऑनलाइन नावे समाविष्ट केली गेली. काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली, पण आयोग भाजपच्या इशाऱ्यावर काम करत आहे.”
नेत्यांचा एकमुखी इशारा
या मेळाव्यात बाळासाहेब थोरात, सुनिल केदार, यशोमती ठाकूर, प्रतिभा धानोरकर यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांनी मतचोरीच्या मुद्द्यावरून भाजपा व निवडणूक आयोगावर तोफ डागत “लोकशाहीवर होत असलेला हल्ला हाणून पाडा” असे आवाहन केले.
👉 कामठीतून गाजलेला ‘वोट चोर, गद्दी छोड’चा नारा आता राज्यभर आणि देशभर पोहोचत असून, काँग्रेसने उभारलेल्या या रणसंग्रामाचा पुढचा टप्पा किती निर्णायक ठरेल, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.