'भ्रष्ट मंत्र्यांना तात्काळ हटवा' – अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे राज्यपालांना निवेदन
महाराष्ट्र वाणी न्युज
मुंबई, दि. २८ जुलै :– राज्य मंत्रिमंडळातील भ्रष्टाचारी, कलंकित व असंवेदनशील मंत्र्यांना तात्काळ पदावरून हटवावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाने आज महामहीम राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ राजभवनात भेटीस गेले.
राज्यातील हनी ट्रॅप प्रकरण, ठाणे-बोरिवली बोगदा गैरव्यवहार, मीरा-भाईंदर महापालिकेतील भूसंपादन प्रक्रिया तसेच अन्य आर्थिक गैरव्यवहारांचा तपशील पत्राद्वारे राज्यपालांच्या निदर्शनास आणून देण्यात आला.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री संजय शिरसाठ, राज्य मंत्री योगेश कदम आणि मंत्री नितेश राणे यांच्या विरोधातील गंभीर प्रकरणांबाबत वस्तुनिष्ठ माहिती शिष्टमंडळाने मांडली. अशा व्यक्तींना मंत्रिपदावर ठेवणे राज्याच्या हिताविरुद्ध असल्याचे मत निवेदनात व्यक्त करण्यात आले.
या वेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व आमदार अॅड. अनिल परब, उपनेते विनोद घोसाळकर, उपनेत्या विशाखा राऊत, सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, उपनेत्या सुषमा अंधारे, उपनेते विजय कदम, सचिव अॅड. साईनाथ दुर्गे, सुप्रदा फातर्पेकर, पराग डाके तसेच आमदार ज. मो. अभ्यंकर, मनोज जामसुतकर, भाऊ कोरगावकर, विठ्ठलराव गायकवाड, नितीन नांदगावकर, अशोक धात्रक, नितीन देशमुख, बबन थोरात, महेश सावंत, बाळा नर आणि हारुन खान आदी उपस्थित होते.
अंतर्गत शुद्धता हवी असेल तर आता कारवाई झालीच पाहिजे – शिवसेनेचा राज्यपालांना ठाम आग्रह!