भारताच्या जडणघडणीत मुस्लिम समाजाचे योगदान अधोरेखित; ‘इंडियन हिस्ट्री एक्झिबिशन २०२६’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
२९ नोव्हेंबरपर्यंत प्रदर्शन सुरू राहणार; शिक्षण, विज्ञान, कला, स्थापत्य आणि संस्कृतीतील ऐतिहासिक योगदानाची नव्या पिढीला मिळतेय माहिती
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २६ :- भारताचा इतिहास हा विविध संस्कृती, परंपरा आणि समाजांच्या योगदानातून घडलेला आहे. देशाच्या प्रगतीत अनेक समुदायांनी आपले ज्ञान, कौशल्य, कला, विज्ञान, शिक्षण आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून मोलाची भर घातली आहे. याच सामायिक ऐतिहासिक वारशाची ओळख नव्या पिढीला करून देण्याच्या उद्देशाने शहरात आयोजित करण्यात आलेले ‘इंडियन हिस्ट्री एक्झिबिशन २०२६’ सध्या नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
इंडियन हिस्ट्री फोरम आणि मौलाना आझाद कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने २२ नोव्हेंबरपासून या प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे. डॉ. रफीक झकेरिया मौलाना आझाद कॉलेज परिसरातील नवल टाटा स्टेडियम येथे भरविण्यात आलेले हे प्रदर्शन २९ नोव्हेंबर २०२६ पर्यंत नागरिकांसाठी खुले राहणार आहे. प्रदर्शनाला विद्यार्थी, तरुण, इतिहासप्रेमी आणि नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
इतिहासातील योगदानाची माहिती एकाच ठिकाणी
या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय इतिहासातील मुस्लिम समाजाचे ऐतिहासिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सामाजिक-आर्थिक योगदान विविध ऐतिहासिक संदर्भ आणि पुराव्यांच्या आधारे मांडण्यात आले आहे. शिक्षण, वैद्यकीय क्षेत्र, खगोलशास्त्र, संशोधन, व्यापार, उद्योग, अर्थव्यवस्था, हस्तकला, नगररचना, स्थापत्यकला आणि सामाजिक सलोखा अशा विविध विषयांची माहिती येथे आकर्षक पद्धतीने सादर करण्यात आली आहे.
दौलताबाद किल्ला, पाणचक्कीचे मॉडेल ठरतेय आकर्षण
प्रदर्शनातील ऐतिहासिक वास्तू आणि वारशाच्या प्रतिकृती विशेष लक्ष वेधून घेत आहेत. दौलताबाद किल्ला आणि ऐतिहासिक पाणचक्की यांच्या मॉडेलमधून तत्कालीन स्थापत्यकला, जलव्यवस्थापन आणि तांत्रिक कौशल्याची माहिती अभ्यागतांना मिळत आहे. याशिवाय जुनी नाणी, ऐतिहासिक शिक्षणसंस्था आणि प्राचीन स्थापत्यकलेशी संबंधित माहितीही प्रदर्शनात मांडण्यात आली आहे.
या उपक्रमाच्या आयोजनात आदिल मदनी, नासिर जोहरी, अब्दुल वहाब यांच्यासह संपूर्ण टीम परिश्रम घेत आहे. इतिहासातील दुर्लक्षित राहिलेल्या अनेक पैलूंची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
सामायिक वारशाची ओळख करून देण्याचा प्रयत्न
कोणत्याही समाजाची ओळख ही त्याचे ज्ञान, संस्कृती, कर्तृत्व आणि समाजासाठी दिलेल्या योगदानातून निर्माण होते. भारताच्या जडणघडणीत मुस्लिम समाजाने दिलेले योगदानही देशाच्या सामायिक वारशाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. कोणत्याही एका समाजाचे श्रेष्ठत्व सिद्ध करणे हा या प्रदर्शनाचा उद्देश नसून, भारताच्या इतिहासात विविध समाजांनी दिलेल्या योगदानाची माहिती वस्तुनिष्ठपणे लोकांसमोर आणणे हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे.
नागरिकांना प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन
शहरातील नागरिक, विद्यार्थी आणि विशेषतः तरुणांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. २९ नोव्हेंबरपर्यंत दररोज सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे.
इतिहास केवळ ऐकीव माहितीच्या आधारे नव्हे, तर ऐतिहासिक तथ्ये आणि पुराव्यांच्या माध्यमातून समजून घेण्याची संधी या प्रदर्शनातून उपलब्ध झाली आहे. भारताच्या ज्ञानपरंपरा, कला, संस्कृती आणि विकासप्रक्रियेत विविध समाजांचे योगदान जाणून घेण्यासाठी हे प्रदर्शन नागरिकांसाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित