फुलंब्रीसह जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी काँग्रेसची उमेदवार निवड प्रक्रिया सुरू!जिल्हा निवड मंडळाची बैठक संपन्न
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. ९ :- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री नगरपंचायत तसेच सिल्लोड, पैठण, वैजापूर, कन्नड, गंगापूर आणि खुलताबाद नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी जिल्हा निवड मंडळाची बैठक आज उत्साहात पार पडली.
या बैठकीस जिल्ह्याचे प्रभारी माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, खासदार डॉ. कल्याणराव काळे, जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहराध्यक्ष शेख युसूफ, माजी मंत्री अनिल पटेल, माजी आमदार नामदेवराव पवार, तसेच प्रदेश काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, जिल्ह्यातील सर्व विधानसभा प्रभारी, सर्व तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, विविध फ्रंटल संघटनांचे अध्यक्ष आणि इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणांचा आढावा घेऊन प्रत्येक नगरपरिषदेसाठी योग्य, जनतेशी निगडित आणि कार्यकर्त्यांच्या पाठबळावर उभे असलेले उमेदवार निवडण्यावर भर देण्यात आला.
जिल्हा निवड मंडळाच्या या बैठकीत उमेदवारांची मुलाखत घेऊन प्राथमिक शिफारसी तयार करण्यात आल्या असून, अंतिम निर्णय प्रदेश पातळीवरील बैठकीत घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
काँग्रेस पक्षाने या निवडणुका विकास आणि स्थानिक प्रश्नांच्या मुद्यावर लढवण्याचा निर्धार व्यक्त केला असून, आगामी काही दिवसांत उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
"जनतेच्या विश्वासावर आम्ही पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्यात काँग्रेसचा झेंडा फडकवू," — तुकाराम रेंगे पाटील
स्थानिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू — काँग्रेसकडून उमेदवार निवडीस वेग!