“प्लास्टिक माफियांवर मनपाचा बुलडोझर! सलग तिसऱ्या दिवशी धडक कारवाई; 1000 किलो जप्त, ₹37 हजार दंड”
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २४ :- शहराला प्लास्टिकमुक्त करण्याच्या निर्धाराने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका प्रशासनाने सलग तिसऱ्या दिवशी जोरदार कारवाई करत प्लास्टिक विक्रेत्यांवर अक्षरशः धडाकेबाज छापेमारी केली. या कारवाईत 1000 किलोहून अधिक प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले असून विविध विक्रेत्यांवर मिळून ₹37 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या मोहिमेत आतापर्यंत तब्बल 11,000 किलोपेक्षा अधिक प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. यामध्ये जवळपास 40 लाख प्लास्टिक पिशव्या व इतर वस्तूंचा समावेश असून त्या वापरात येण्यापूर्वीच रोखण्यात मनपाला मोठे यश मिळाले आहे.
घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत शहरातील मध्यवर्ती भागात नागरी मित्र पथकाने अचानक छापेमारी करत अनेक गोडाऊन आणि दुकानांवर कारवाई केली. सततच्या या धाडसत्रामुळे नियमभंग करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
या कडक कारवाईचा परिणाम म्हणून काही विक्रेत्यांनी स्वतःहून पुढे येत प्रतिबंधित प्लास्टिक मनपाकडे जमा करण्यास सुरुवात केली आहे. जप्त केलेल्या प्लास्टिकची विल्हेवाट लावून ते पुन्हा वापरात येऊ नये यासाठीही प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत.
मनपा प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की, प्लास्टिक साठवणूक, विक्री किंवा वापर याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. नियमभंग करणाऱ्यांवर अचानक छापेमारी, दंड आणि आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल.
मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त नंदकिशोर भोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई राबविण्यात आली. अधिकाऱ्यांसह नागरी मित्र पथक आणि स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.
शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी मनपाचा हा ‘एक्शन मोड’ पुढेही कायम राहणार – नियम मोडणाऱ्यांसाठी आता ‘नो मर्सी’!