प्रेयसीवर गोळी झाडणारा कुख्यात ‘तेजा’ — पोलिसांनी भर रस्त्यात काढली धिंड, शहरभर खळबळ!
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १३ :- हर्सूल कारागृहातून नुकताच जामिनावर बाहेर आलेला कुख्यात गुंड सय्यद फैसल उर्फ तेजा (वय ३०, रा. किले अर्क, छत्रपती संभाजीनगर) पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. काही दिवसांपूर्वी त्याने आपल्या प्रियसीवर गोळीबार करून तिला जखमी केले. एवढेच नव्हे, तर इन-कॅमेरा व्हिडिओतून “आणखी दोन-तीन मुलींना ठार मारणार” अशी उघड धमकी दिली होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला आणि शहरभर संतापाची लाट उसळली.
धिंड काढून पोलिसांचा गुंडांना इशारा
गुंड तेजाची वाढती दहशत रोखण्यासाठी शहर पोलिसांनी थेट धडक कारवाई करत त्याची आमखास मैदान ते किले अर्क असा भर रस्त्यात धिंड काढली. या वेळी त्याच्या पायात चप्पलसुद्धा नव्हत्या. नंतर बुड्डी लाईन आणि कॅनॉट परिसरातही त्याची धिंड काढून स्थानिकांना पोलिसांची ताकद दाखवण्यात आली.
गुन्हेगारी इतिहास थरकाप उडवणारा
फैसल उर्फ तेजाच्या विरोधात एनडीपीएस अॅक्टसह तब्बल १९ गंभीर गुन्हे विविध पोलिस ठाण्यांत नोंद आहेत. अंमली पदार्थांची तस्करी, मारहाण, दहशत माजवणे, अवैध शस्त्रसाठा अशा अनेक गुन्ह्यांमुळे तो पोलिसांच्या रडारवर होता. प्रियसीवर केलेल्या गोळीबारात वापरलेले पिस्तूल लपविल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्याला चौकशीसाठी आणले. तपासादरम्यान तो बंदुकीचे ठिकाण बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचेही समोर आले आहे.
“दहशत सहन केली जाणार नाही” – पोलिस
बेगमपुरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मंगेश जगताप यांनी सांगितले की,
“शहरात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांना पोलिस कधीही पाठीशी घालणार नाहीत. दादागिरी करणाऱ्यांना कायद्याच्या चौकटीत राहून धडा शिकवला जाईल.”