प्रशासनात सकारात्मकतेने काम करुन नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.२१ : – शासकीय सेवेत कार्यक्षमतेने नागरीकांना सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, तसेच शासनाच्या विविध योजनांची सकारात्मकतेने प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी नगर परिषद विभागातील अधिकारी कर्मचारी प्रशिक्षणाच्या उद्घाटन कार्यक्रमात दिले.
नगर विकास विभाग अंतर्गत असलेल्या नगरपरिषद व नगरपंचायतमधील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी एक दिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन सभागृहात करण्यात आले होते.
सहआयुक्त नगरपरिषद प्रशासनचे सय्यद रफिक, सहायक आयुक्त ऋषिकेश भालेराव, खुलताबाद नगरपरिषदेचे मुख्याधिकारी समिर शेख, फुलंब्री नगरपरिषदेचे ज्ञानेश्वर ढोंबरे, गंगापूर नगरपालिकेचे संतोष आगळे,वैजापूर नगरपालिकेचे विघोत भागवत,सिल्लोड नगरपालिकेचे कारभारी दिवेकर, पैठण नगरपालिकेचे मुख्यााधिकारी श्रीमती पल्लवी अंभोरे, सोयगाव नगरपरिषदेचे संभाजी देशमुख आदी तसेच नगरपरिषद व नगरपंचयातमधील अधिकारी तसेच अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
शासनाचे विविध उपक्रम, योजना, सुविधा व सेवा नागरिकांपर्यंत पोहचविताना पारदर्शकता व जबाबदारी ठेवणे हीच खरी सेवाभावाची गुरुकिल्ली आहे,” स्वच्छता अभियान, पाणीपुरवठा, कर वसुली, डिजिटल सेवा याबाबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले. नागरिकाभिमुख कार्यपद्धती अंगीकारून नगरपरिषद व नगरपंचायत प्रशासन अधिक सक्षम व परिणामकारक व्हावे.कोणत्याही अधिकारी-कर्मचाऱ्याचे व्यक्तिमत्व हे केवळ बाह्य देखाव्यात नसून त्याच्या विचारात, कामाच्या पद्धतीत, शिस्तीत व नागरिकांशी असलेल्या संवादात दिसून येते. सेवेत असताना सकारात्मक दृष्टिकोन, प्रामाणिकपणा आणि कामाची पारदर्शकता यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांचे व्यक्तिमत्व अधिक प्रभावी बनते. तसेच विकास ही केवळ पायाभूत सुविधांची उभारणी नसून नागरिकांचा सहभाग, स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, शिक्षण व तंत्रज्ञान अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात या सर्व पैलू लक्षात घेऊन काम केले पाहिजे, असे जिल्हाधिकारी श्री.स्वामी यांनी मार्गदर्शानात मनोगत व्यक्त केले.
शिस्त, टीमवर्क, वेळेचे व्यवस्थापन, सकारात्मक संवादकौशल्य आणि समस्या सोडविण्याची क्षमता या गुणांचा अवलंब करावा .कामाच्या ताणतणावात मुक्ती साठी अशोक देशमुख यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात उत्कृष्ट काम करणारे 18 अधिकारी कर्मचारी यांना प्रशिस्ती पत्र देऊन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सन्मानित केले.