"नोटीस नाही, मोबदला नाही... थेट बेघर!" – विनोद पाटील यांचा प्रशासनावर हल्लाबोल

"नोटीस नाही, मोबदला नाही... थेट बेघर!" – विनोद पाटील यांचा प्रशासनावर हल्लाबोल

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. ३० जुलै :

शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांच्या घरावर बुलडोझर चालवण्याच्या प्रशासनाच्या कारवाईवर आता जनतेच्या संतापाचा सूर अधिकच तीव्र झाला आहे. विनोद पाटील यांनी आज प्रशासनावर थेट आरोप करताना म्हटले की, कोणतीही कायदेशीर नोटीस न देता, मोबदला न देता, पावसाळ्यात लोकांना उघड्यावर काढणे हे अमानवी आहे.

पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला की, "प्रशासनाने अतिक्रमण हटविण्यापूर्वी लोकांशी संवाद साधला का? नोटीस दिली का? काय कोणताही नकाशा किंवा पुरावा दाखवला का?" — असे गंभीर मुद्दे उपस्थित करत त्यांनी या कारवाईत फक्त दहशत निर्माण करण्याचा हेतू असल्याचा आरोप केला.

ते पुढे म्हणाले, "शहराचा विकास व्हावा, स्वच्छता वाढावी याचा विरोध नाही. पण त्यासाठी बेघर माणसांच्या छाताडावरून रस्ता नेऊ नका. प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशाचा आदर ठेवत कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी."

पोलीस आयुक्तांना विनंती

या संपूर्ण मोहिमेत पोलिसांनी महापालिकेला बळ देऊ नये, अशी मागणी करत त्यांनी पोलीस आयुक्तांना आवाहन केलं की, "महापालिकेला प्रश्न विचारावेत – संवाद केला का? मोबदला दिला का? कशाच्या आधारावर कारवाई केली?"

सोमवारपर्यंत अल्टिमेटम

"जर सोमवारी पर्यंत पीडितांची यादी व मोबदला जाहीर करण्यात आला नाही, तर आम्हाला आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल," असा निर्वाणीचा इशारा विनोद पाटील यांनी दिला.

"शहरासाठी सामान्यांचा बळी देऊ नका!"

या कारवाईमुळे अनेक महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक बेघर होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. काही ठिकाणी मुलांचे शालेय साहित्य, संसारोपयोगी वस्तू पावसात भिजून गेले असून, प्रशासनाने बिल्डरधार्जिण्या भूमिकेमुळे सामान्य नागरिक भरडले जात आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे.

 जनतेच्या भावना दुर्लक्षित केल्यास आंदोलन अटळ!